कमलेश तिवारी हत्याकांड (Kamlesh Tiwari Murder Case) प्रकरणात गुजरात एटीएसने सूरत (Surat) येथून 6 जणांना ताब्यात घेतले आहे. या 6 जणांवर कमलेश तिवारी हत्याकांड प्रकरणात सहभागी असल्याचा संशय आहे. या सहा जणांना अटक केल्यानंतर गुजरात एटीएस (Gujarat ATS) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh ATS) अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांकडून बिजनौर येथे मौलाना अनवारुल हक यांचीही चौकशी सुरु आहे. कमलेश तिवारी यांची गोळ्या झाडून शुक्रवारी हत्या करण्यात आली होती.
कमलेश तिवारी हत्याकांड प्रकरणात बिजनौर येथील दोन मौलानांवर लखनऊ येथे प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली मौलानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौलाना मुफ्ती नईम काजमी, इमाम मौलाना अनावारुल हक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मौलानांची नावे आहेत. कमलेश यांचे डोके मारणाऱ्याला या दोन मौलानांनी 2015 मध्ये 1.5 कोटी रुपयांचे इनाम ठेवले होते. कमलेश तिवारी यांच्या पत्नीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.नाका हिंडोला पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मौलाना अनावारुल यांना अटक करण्यात आली नसून, केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, ही चौकशी सुरु असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने बरेली विभागाचे एडीची अविनाश चंद्रा यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणात गुजरात (Gujarat) एटीएसने सुरत येथून 6 जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांवर हत्येचा कट रचणे आणि प्रत्यक्ष हत्तेत संशयास्पद सहभाग असल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांची गोळी झाडून हत्या, पोलिसांकडून तपास सुरु)
प्राप्त माहिती अशी की, कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर त्यांच्या खोलीत सूरत येथील घारी मिठाईचा डबा मिळाला होता. घारी ही सूरतमधील अत्यंत प्रसिद्ध अशी मिठाई आहे. या डब्यातूनच आरोपींनी हत्यारं आणली होती. सांगितले जात आहे की, सूरत येथून फूड अॅण्ड स्वीट दुकानातून घारी मिठाई खरेदी करण्यात आली होती. प्राप्त महितीवरुन गुजरात एटीएसने लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर या सहा संशयीतांना ताब्यात घेतले.
एएनआय ट्विट
Avinash Chandra, ADG Bareilly Zone clarifies, "Maulana Anwarul Haq has not been arrested, investigation still underway". #KamleshTiwari https://t.co/pvGbMmAWGN
— ANI UP (@ANINewsUP) October 19, 2019
गुजरात एटीएसने या आधी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर 2017 मध्ये आयएसआय दहशतवाद्यांना पकडले होते. दोन्ही आरोपींना कमलेश तिवारी यांचा व्हिडिओ दाखवून त्यांना मारण्यास सांगितल्याचे पुढे आले होते. त्या वेळी अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी चौकशी दरम्यान कमलेश तिवारी यांचे नाव घेतले होते.