Jabalpur Hospital Fire (Photo Credits: IANS Twitter)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूरमधील (Jabalpur) चांडाल भाटा भागातील न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी भीषण आग (Fire) लागली. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले व ती इतरत्र पसरली. एएनआयच्या वृत्तानुसार यामध्ये, कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. काही गंभीर भाजलेल्या रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आग आटोक्यात आणली.

जबलपूरचे एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी दहा जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्याच वेळी, जिल्हाधिकारी इलैया राजा यांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली. त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

प्राथमिक तपासात व्होल्टेजमध्ये चढ-उतार झाल्याने जनरेटरने पेट घेतला आणि संपूर्ण इमारतीला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाने तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये रुग्णालयाचा एक मजला संपूर्ण जाळून खाक झाला आहे. आग इतकी भीषण होती की लोकांना बाहेर पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. अपघाताच्या वेळी रुग्णालयात किती रुग्ण दाखल होते, किती नातेवाईक होते याची माहिती संकलित करण्यात येत आहे. (हेही वाचा: व्यक्तीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून बाहेर काढली 63 नाणी; ढीग पाहून डॉक्टरही थक्क)

घडलेल्या घटनेबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान दुःख व्यक्त करताना म्हणाले, ‘ जबलपूर येथील रुग्णालयात भीषण आग लागल्याची दुःखद बातमी मिळा. मी स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्या सतत संपर्कात आहे. या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवण्याच्या सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्या आहेत. मदत आणि बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.’ दरम्यान, याआधी याआधी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला भोपाळमधील हमीदिया हॉस्पिटलच्या शिशु वॉर्डमध्ये आग लागली होती. यामध्ये किमान पाच मुलांचा मृत्यू झाला होता. यावरूनही राजकारण तापले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानुसार सर्व रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते.