International Yoga Day 2019: आंतरराष्ट्रीय योग दिन आज (शुक्रवार, 21 जून 2019) भारतासह जगभरात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते केंद्रीय मंत्रिमंडळ आणि देशातील अनेक राज्यांचे मख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ योगा करताना दिसले. दरम्यान,योग दिनानिमित्त संरक्षण मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Cm Manohar Khattar) यांच्या कार्यक्रमात एक भलताच प्रकार पाहायला मिळाला. योग दिनाचा कार्यक्रम अटोपून अमित शाह आणि मनोहर लाल खट्टर परत फिरताच कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांनी चक्क चटईवर डल्ला मारला.
हरियाणा राज्यातील रोहतक येथील कार्यक्रमात ही घटना घडली. अमित शाह आणि मनोहरलाल खट्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे योगदिनानिमत्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर अमित शाह आणि खट्टर हे निघून जाताच नागरिकांनी योगा करण्यासाठी वाटण्यात आलेल्या चटया पळवण्यास सुरुवात केली. चटया पळविण्यास कार्यक्रम व्यवस्थापनाने विरोध करताच वादावादीचे प्रसंगही कार्यक्रमस्थळी पाहायला मिळाले.
योग दिनाच्या कार्यक्रमासाठी रोहतकमध्ये विशेष तयारी करण्यात आली होती. नागरिकांना योगा करता यावा यासाठी हजारो चटया अंथरण्यात आल्या होत्या. मात्र, कार्यक्रम संपताच नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सुरुवातीला हा गोंधळ कशासाठी आहे हे ध्यानात येत नव्हते. मात्र, काही वेळाने कळले की हा गोंधळ चटई पळविण्यावरुन निर्माण झाला होता. (हेही वाचा, International Yoga Day: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपति भवनात तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजपथावर साजरा केला आंतरराष्ट्रीय योगा दिवस)
दरम्यान, आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने देशभरातील कानाकोपऱ्यात योगा दनिस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: झारखंड येथील रांची येथे योगा केला. तर, योगगुरु बाबा रामदेव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नांदेड येथे योगा केला.