Indian Stock Market | (Photo credit: archived, edited, representative image)

भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market Update) आज (5 जून) पुन्हा एकदा सावरला. आज सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा (BSE) सेन्सेक्स (Sensex) आणि नॅशनल स्टॉक एक्चेंजचा (NSE) निफ्टी (Nifty) पुन्हा एकदा दमदार उसळी मारताना दिसला. बाजारात आज दिसलेल्या वधाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाठिमागील चार वर्षांतील सर्वात मोठी घसरण अनुभवल्यानंतर पुढच्या काहीच तासांमध्ये बाजार जवळपास पुर्वपदावर आला. लोकसभा निवडणूक निकाल अस्थिरता दर्शवू लागल्याने बाजार कोसळला होता. ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीतील ₹31 लाख कोटी नष्ट झाले.

सरकार अस्थिरतेच्या कल्पनेने कोसळला बाजार

लोकसभा निवडणूक निकाल मंगळवारी (4 जून) रोजी जाहीर झाले. या निकालादरम्यान स्पष्ट झाले की, भाजपला स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे. परिणामी सरकार अस्थिर होणार या कल्पनेमुळेच भारतीय शेअर बाजार जवळपास 6% घसरला होता. तथापि, खालच्या पातळीवरील मूल्य-खरेदीमुळे आज लक्षणीय वधार पाहायला मिळाला. (हेही वाचा, Stock Market: शेअर बाजार 2,700 अंकांनी कोसळला; लोकसभा निवडणूक ट्रेंड Sensex,Nifty साठी निराशाजनक)

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वधार

देशातील शीर्ष 30 समभागांचे प्रतिनिधित्व करणारा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज निर्देशांक सेन्सेक्स दुपारी 2:45 च्या सुमारास 2,000 अंकांनी वाढून 73,000 च्या पातळीवर परत गेला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी जवळपास 700 अंकांनी वधारला.

आजचे टॉप गेनर्स खिलाडी

सेन्सेक्स पॅकमध्ये सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, एशियन पेंट्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आयटीसी यांचा समावेश होता.

विश्लेषकांचा अंदाज

दरम्यान, शेअर बाजार आणि राजकीय परिस्थितीबद्दल विश्लेषक आशावादी आहेत. काही विश्लेषकांचे म्हणने असे की, बाजाराला बदलती राजकीय परिस्थीत स्वीकारायला बराच वेळ जाईल. तसेच, मोदी 3.0 कॅबिनेटबाबत स्पष्टता येईपर्यंत ही अस्थिरता कायम राहील.

भाजप बहुमतापासून दूरच

भाजपने 240 जागा जिंकल्या, स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 272-आकड्यांपेक्षा कमी पडल्या. परंतु मंगळवारी निवडणूक निकालांनुसार, आपल्या मित्रपक्षांच्या पाठिंब्याने आवश्यक आकडा गाठण्यात यशस्वी झाला. काँग्रेसला 99 जागा मिळाल्या.

एक्झिट पोल अंदाज फसले

एक्झिट पोलने भाजपला स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवला होता. ज्यामुळे शेअर बाजार सोमवारी विक्रीमी उंचीवर पोहोचला. मात्र, लगेचच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोल्स चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे बाजार मोठ्या प्रमाणावर कोसळला. सेन्सेक्स 4,000 अंकांपेक्षा अधिक घसरला, जो कोविड-19 युगानंतरची सर्वात मोठी घसरण आहे. बाजारातील शेवटची लक्षणीय मंदी 23 मार्च 2020 रोजी आली, जेव्हा बाजार 13% पेक्षा जास्त घसरले होते.