Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमणाच्या बाबतीत भारतामध्ये सध्या चिंतेची परिस्थिती आहे. देशात ज्या वेगाने दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत ते पाहून या आजाराची व्याप्ती लक्षात येते. आता तर रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताने ब्रिटनला (Britain) मागे टाकले आहे. आज संध्याकाळी भारतातील वाढलेल्या घटनांमुळे सध्या भारत 4 थ्या क्रमांकाचा कोरोना बाधित देश बनला आहे. https://www.worldometers.info/ या वेबसाईट नुसार भारतामध्ये आज संध्याकाळपर्यंत 297,205 रुग्ण आढळले असून, 8,477 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 146,238 इतके रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.

ब्रिटन मध्ये एकूण 291,409 रुग्ण आढळले आहेत. आता फक्त रशिया, ब्राझील आणि अमेरिका हे देश भारताच्या पुढे आहेत. या तीनही देशांची अनुक्रमे रुग्ण संख्या 502,436, 787,489 व 2,076,094 इतकी आहे. 24 मे रोजी भारताने पहिल्या 10 च्या यादीत प्रवेश केल्यानंतर, देशातील कोरोना व्हायरसची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यास भारताला अवघ्या 18 दिवसांचा कालावधी लागला आहे. महत्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी भारताने स्पेन आणि इटली अशा दोन बाधित देशांनाही मागे टाकले आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 97,648 वर)

देशातील सर्वात मोठा कोरोना व्हायरस हॉटस्पॉट असलेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाची 97,648 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्र सध्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यानंतर तामिळनाडू आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. राष्ट्रीय राजधानीत एकूण 34,687 प्रकरणे आहेत. केंद्राने 25 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केले होते, त्या वेळी देशात 500 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली होती व दहा जणांचा मृत्यू झाला होता. मात्र अवघ्या दोन महिन्यांत भारत जगातील 4 था देश बनला आहे. आता तर सरकारने लॉक डाऊनचे नियमही शिथिल केले आहेत, त्यामुळे रुग्ण संख्येत अजून वाढ होण्याची शक्यात आहे. जगाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या जगात एकूण 7,538,976 कोरोना बाधित रुग्ण असून, एकूण 421,365 मृत्यू झाले आहेत.