File image of Imran Khan and Narendra Modi | (Photo Credits: Twitter/@IndianMEA)

भारत (India)  व पाकिस्तान (Pakistan) या दोन देशातील वादातीत संबंध सुधारण्यासाठी चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी करणारे एक पत्र पाकिस्तनचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan)  यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांना लिहिले आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार  सलग दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेल्या मोदींना शुभेच्छा देत काश्मीरच्या मुद्द्यासकट सर्व मतभेद व वाद सोडवण्यासाठी इमरान खान यांनी या पत्रातून तयारी दाखवली आहे. दोन्ही देशांतील नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि प्रादेशिक विकासासाठी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, असे देखील इमरान  यांनी म्हंटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होईल: इम्रान खान

पाकिस्तानचे विदेश मंत्री महमूद कुरैशी यांनी देखील भारताचे नवनिर्वाचित परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना संबोधून एक पत्र लिहिले होते, ज्यानुसार त्यांनी अलीकडेच कार्यभार स्वीकारलेल्या जयशंकर यांचे अभिनंदन करून त्यांना समान चर्चेची मागणी केली होती. या पत्रात लिहिल्यानुसार "इस्लामाबाद ला नव्या दिल्लीशी चर्चा करायची आहे"असे म्हंटले होते, दोन्ही देशात शांती प्रस्थपित करण्यासाठी सगळे वाद सोडून देण्यासाठी ही चर्चा आवश्यक आहे असे महमूद यांनी लिहिले आहे.

 पुलवामा येथे झालेल्या भीषण हल्य्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अगोदरच खराब असलेल्या संबंधात भर पडली होती . मात्र लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व यशानंतर सर्व हेवेदावे बाजूला सारून इमरान खान यांनी 26 मे ला मोदींशी फोनवरून संपर्क साधला होता यावेळीदेखील इम्रान यांनी अभिनंदन करून अशाच प्रकारची मागणी केली होती. यावर उत्तर देत मोदी यांनी देखील आपण दोन्ही राष्ट्रांमध्ये आतंकवाद मिटवून शांततापूर्ण वातावरणासाठी प्रयत्न करत आहोत असे सांगितले होते.