Himachal Pradesh Political Updates: हिमाचल प्रदेश राज्यात राज्यसभा निवडणूक 2024 दरम्यान, मोठ्या राजकीय हालचाली घडल्या. सत्ताधारी काँग्रेस पक्षातीलच काही आमदारांनी पक्षविरोधी मतदान (क्रॉस व्होटींग) केले. परिणामी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला. तेव्हापासून या राज्यात राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. दरम्यान, मध्येच वृत्त आले की, हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला. या चर्चांवर स्वत: मख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी प्रतिक्रिया देत सर्व वृत्त आणि चर्चांचे खंडण केले. आपण लढवय्ये आहोत. पदाचा राजीनामा दिला नाही आणि शेवटपर्यंत लढत राहू असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे सहा आमदार भाजपच्या संपर्कात
एका पत्रकार परिषदेदरम्यान, मख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल विविध प्रसारमाध्यमांमधून पसरत असलेल्या बातम्या केवळ अफवा आहेत. त्याला कोणताही आधार नसल्याचे सांगत आपण पद सोडले नसल्याचे त्यांनी ठामपणे जाहीर केले. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आपण आपले बहुमत दाखवून देऊ तसेच काँग्रेस सरकारचा पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निकालांमुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर सुक्खू यांचे वक्तव्य आले आहे. राज्य विधानसभेत भाजपचे अल्पसंख्याक प्रतिनिधित्व असूनही भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार हर्ष महाजन यांच्या विजयामुळे काँग्रेस सरकार कोसळण्याचा धोका आहे. दरम्यान, क्रॉस-व्होट केलेले सहा काँग्रेस आमदार आणि तीन अपक्ष आमदार हरियाणातून शिमल्यात परतले आहेत आणि भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
काँग्रेस सरकार अस्थिर
राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी तीन अपक्ष आमदारांसह भाजपच्या बाजूने मतदान केल्याने भाजप उमेदवाराचा विजय झाला आणि काँग्रेस उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे हिमाचलमध्ये असलेले काँग्रेस सरकार कोसळते की काय अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. त्यामुळे हिमाचलमधील काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचे संकट उभे राहिले आहे. असे असतानाच भाजपने राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांच्याकडे सरकारविरोधात अविश्वास व्यक्त केला. तसेच, मुख्यमंत्र्यांनी बहुमत दाखवून द्यावे असे म्हटले. एका बाजूला हा गोंधळ सुरु असतानाच कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी सख्खू यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले आणि आमदारांमधील असंतोषाचे कारण देत राजीनामा दिला.
व्हिडिओ
#WATCH | Himachal Pradesh CM Sukhvinder Singh Sukhu says "One of the MLAs (who voted for BJP candidate in RS polls) has said to forgive him as he has betrayed the party...People of the state will give them an answer..."
On Vikramaditya Singh's resignation, CM says, "I have… pic.twitter.com/PUKB45jd0M
— ANI (@ANI) February 28, 2024
काँग्रेस डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात
हिमाचल प्रदेश विधानसभेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. विद्यमान आणि वेगवान राजकीय घडामोडींमध्ये हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी कथित गैरवर्तनासाठी 15 भाजप आमदारांचे निलंबन केले आहे. दरम्यान, काँग्रेसने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेस नेते डीके शिवकुमार आणि हिमाचलचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांना पाठविण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.