गुजरात मध्ये वाहतुकीच्या दंडामध्ये कपात, अशाप्रकारे कोणत्याही राज्याला नियमात बदल करता येणार नाही- नितीन गडकरी
नितीन गडकरी (Photo Credits: PTI)

देशात नवीन वाहतुकीच्या कायद्यानुसार करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईतील भरघोस रक्कमेमुळे नागरिकांमध्ये नाराजगी दिसून येत आहे. यामुळे काही राज्यात वाहतुकीच्या दंडासाठी आकारण्यात येणाऱ्या रक्कमेत कपात करण्याचा विचार करत आहे. याच पार्श्वभुमीवर गुजरात (Gujrat) मधील विजय रुपाणी यांच्या सरकारने दंडाची रक्कम कमी केली आहे. यावर आता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गडकरी यांनी असे म्हटले आहे की, मोटार वाहन कायदा विधेयकामधील कोणत्याही नियमात बदल करता येणार नसल्याचे म्हटले आहे.

गुजरात मध्ये मंगळवारी वाहतूकीच्या दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुचाकी आणि शेतीच्या कामासाठी उपयोगात येणाऱ्या वाहनांवर सूट देण्यात आली. तर रुपाणी यांनी एका पत्रकार परिषदेत असे म्हटले की, आम्ही सुधारित वाहतुकीच्या नियमात बदल केले आहे. त्यानुसार दंडाची रक्कम सुद्धा कमी केली आहे.

नव्या नियमानुसार हेल्मेट न घातल्यास 1000 ऐवजी 500 रुपयांचा दंड, सीट बेल्ट नसल्यास 500 रुपये वसूल करण्यात येणार आहेत. त्याचसोबत वाहन परवाना नसून गाडी चालवल्यास नियमांनुसार 5000 रुपये एवढी दंडाची रक्कम वसूल केली जाते. मात्र गुजरात मध्ये चालकांकडून 2000 आणि अन्य वाहनांसाठी 3000 रुपये दंड स्विकारला जात आहे.(नोएडा: वाहतूक पोलिसांनी चलान कापण्याची धमकी दिल्याने वाहन चालकाला हृदयविकाराचा झटका, मृत्यू)

तसेच गडकरी यांनी विविध राज्यांतील वाहतूक नियमांसंबंधित माहिती घेतली आहे. तसेच सुधारित वाहतुकीच्या नियमांचे स्वागत केले आहे. त्यामुळे कोणतेही राज्य यापासून दूर राहू शकत नाही. त्याचसोबत गडकरी यांना सुद्धा गाडी वेगाने चालवल्यामुळे चलानची रक्कम भरावी लागली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.