Balasaheb Thackeray | (File Image)

गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Election 2022) सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार काल संपला. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात उद्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या आधी, भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची जुनी क्लिप शेअर केली आहे. क्लिपमध्ये बाळ ठाकरे म्हणत आहेत की, ‘नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया’.

गुजरातमध्ये उद्या पहिल्या टप्प्यात 89 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे ज्यासाठी 2.39 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र आहेत. आता बाळासाहेब ठाकरेंची क्लिप शेअर करताना जडेजाने लिहिले- ‘अभी भी समय है समज जाओ गुजराती’. डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तिकिटावर जुनागढमधून 2022 ची गुजरात विधानसभा निवडणूक लढवत आहे.

जडेजा आपल्या पत्नीचा प्रचार सभांमध्ये तिला मदत करत आहेत. याआधी तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तिला पाठींबा देताना दिसला होता. आता जडेजाने शेअर केलेल्या क्लिपमध्ये बाळासाहेब ठाकरे जनतेला संबोधित करताना दिसत आहेत. यावेळी ते म्हणतात, ‘माझे इतकेच सांगणे आहे की, ‘नरेंद्र मोदी गया, गुजरात गया’. हे माझे वाक्य आहे. जर तुम्ही मोदींना बाजूला ठेवले तर तुमचा गुजरात गेला. माझे हे वाक्य मी लालकृष्ण अडवाणींनाही सांगितले आहे.’ (हेही वाचा: राहुल गांधी म्हणतात मीडीया शेतकर्‍यांचे प्रश्न, बेरोजगारी सारखे मुद्दे सोडून विराट कोहली, ऐश्वर्या रायच्या बातम्या देतात कारण...)

गुजरातमधील गोध्रा दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. दरम्यान, अलीकडेच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना कसे समर्थन केले याचा एक किस्सा शेअर केला. ठाकरे म्हणाले, दंगलीनंतर ‘मोदी हटाओ’ ही मोहीम होती. अडवाणी एका सभेसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांना मोदींना हटवायचे का?, असा सवाल केला. त्यावेळी मोदींना हात लावू नका असे, बाळासाहेब म्हणाले होते. मोदी गया ते गुजरात गया. त्यावेळी आम्ही हिंदुत्वाला पाठिंबा दिला, असे ठाकरे म्हणाले.