शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी (Farmers Protest) संबंधित 'टूलकिट’ (Toolkit) सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी 21 वर्षीय दिशा रवी नावाच्या पर्यावरण कार्यकर्तीला बंगळूर येथून अटक केली. आता या प्रकरणात दिल्लीच्या कोर्टाने मुंबईची कार्यकर्ता-वकील निकिता जेकब (Nikita Jacob) आणि शांतनु यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले आहेत. पोलिस दोघांचा शोध घेत असून त्यांचे लोकेशन मिळताच त्यांना अटक केली जाईल. स्पेशल सेलच्या सूत्रांच्या माहितीनुसार 11 फेब्रुवारीला निकिता जेकबच्या घरी खास सेलची टीम सर्चसाठी गेली होती. हे पथक मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण तपासण्यासाठी गेले होते. संध्याकाळ झाली होती, म्हणून चौकशी केली जाऊ शकली नाही. निकिता तपासणीत सामील होईल या कागदपत्रांवर स्पेशल सेलने तिची स्वाक्षरी घेतली होती, परंतु त्यानंतर निकिता फरार आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की दिशा रवीने स्वीडनच्या ग्रेटा थनबर्गला एक टूल किट दिले होते व संपूर्ण प्रकरणात ती मुख्य सूत्रधार आहे. याचा 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसक निदर्शनाशी संबंध असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांशी संबंधित टूलकिट बदलताना त्यांनी काही गोष्टी जोडल्या आणि त्या पुढे पाठवल्याचा आरोप आहे. जेव्हा ग्रेटा थनबर्गने हे टूलकिट शेअर केले तेव्हा दिशा रवीने ग्रेटाला हा टूलकिट सार्वजनिक झाल्याचे सांगितले होते. नंतर ग्रेटाने ते हटवले व त्याचे संपादित आवृत्ती शेअर केली.
दिल्ली पोलिसांनी दिशा रवीविरोधात देशद्रोह, हिंसाचार, गुन्हेगारी कट रचल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. टूलकिट तयार करण्याच्या सहकार्याबद्दल तिच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी कोर्टाने दिशा रवीला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कृषी कायदाविरोधी आंदोलन भडकवण्याच्या षडयंत्राचा भाग म्हणून टूलकिट मोहीम राबविण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यातील दिशा ही पहिली अटक आहे. (हेही वाचा: Greta Thunberg Toolkit Case: ग्रेटा थनबर्ग 'टूलकिट' प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; बेंगलुरूमध्ये 21 वर्षीय क्लाइमेट अॅक्टिविस्ट दिशा रवी ला अटक)
ट्विटरवर शेअर केलेल्या टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटविरूद्ध निकिता जेकबने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अंतरिम संरक्षणासाठी निकिता जेकब उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. निकिता जेकब पेशाने वकील असून या प्रकरणात ती फरार आहे. याप्रकरणी आता उद्या सुनावणी होईल.