Special Trains For Festive Season: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आता दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ सणांसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे जवळपास 6,000 विशेष गाड्या चालवणार आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या कालावधीत मागणीतील वाढ हाताळण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष गाड्यांव्यतिरिक्त, 108 नियमित गाड्यांमध्ये अतिरिक्त सामान्य डबे बसविण्यात आले आहेत. तसेच वाढलेला प्रवासी भार व्यवस्थापित करण्यासाठी 12,500 कोच मंजूर करण्यात आले आहेत.
रेल्वेमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले की, यंदाच्या सणाच्या हंगामासाठी आतापर्यंत एकूण 5,975 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी या गाड्यांची संख्या 4429 होती. यंदा सणासुदीसाठी जाणाऱ्या एक कोटीहून अधिक प्रवाशांना या रेल्वे गाड्यांचा लाभ घेता येणार आहे. 9 ऑक्टोबरपासून दुर्गापूजा सुरू होणार असून दिवाळी 31 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. तसेच छठ पूजा 7 आणि 8 नोव्हेंबरला होणार असल्याचंही अश्विनी वैश्णव यांनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा -Diwali Special Trains On Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर हिवाळा, दिवाळी, छट पूजा साठी स्पेशल ट्रेन्स ची घोषणा; पहा यादी)
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने सणासुदीच्या काळात तिकीट नसलेल्या प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तिकीट-तपासणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने 20 सप्टेंबर रोजी 17 झोनच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून 1 ते 15 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीसाठी तिकीट नसलेल्या आणि अनधिकृत प्रवाशांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यास सांगितले आहे.
विविध रेल्वे विभागांमध्ये सुरू असलेल्या नियमित मोहिमेचा भाग असलेले रेल्वे व्यावसायिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, सामान्य लोकांबरोबरच पोलीस कर्मचारीही सणासुदीच्या वेळी त्यांच्या रडारवर असतील कारण ते सर्वोच्च उल्लंघन करणाऱ्यांमध्ये आहेत. गाझियाबाद आणि कानपूर दरम्यान आमच्या नुकत्याच झालेल्या अचानक तपासणीत, आम्हाला शेकडो पोलिस विविध एक्स्प्रेस आणि मेल ट्रेनच्या एसी डब्यांमध्ये कोणत्याही तिकीटाशिवाय प्रवास करताना आढळले. आम्ही त्यांच्यावर दंड ठोठावला, तेव्हा सुरुवातीला त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि आम्हाला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.