गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आज (2 सप्टेंबर) त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. दरम्यान डॉ. प्रमोद सावंत हे asymptomatic म्हणजेच त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नसल्याने त्यांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आहे. ट्वीटरच्या माध्यमातून माहिती देताना त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाची कामं ते घरातूनचं पाहणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांनी मागील काही दिवसांत संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.
गोव्यामध्ये केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिल्लीहून एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने येऊन त्यांची तपासणी केली होती.
डॉ. प्रमोद सावंत यांचे ट्वीट
I wish to inform all that I have been detected COVID19 positive. I am asymptomatic and hence have opted for home isolation. I shall continue to discharge my duties working from home. Those who have come in my close contact are advised to take the necessary precautions.
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) September 2, 2020
गोव्यामध्ये सुरूवातीच्या टप्प्यांत कोरोनाचा फैलाव रोखण्यास राज्याला यश आलं होतं. दरम्यान जसा अनलॉक सुरू झाला तशी वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वीच डॉ. सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात गणेशोत्सवाच्या काळात कोरोना व्हायरस लॉकडाऊनचं उल्लंघन आणि सोशल डिस्टंसिंग पाळले न गेल्याने कोरोनाच्या रूग्णात वाढ पहायला मिळाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत 78,357 नवे कोरोना बाधित आढळून आले असून 1045 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सध्या भारतामध्ये कोरोना बाधितांचा आकडा 37,69,524 वर पोहचला आहे.