गोवा: 5 शालेय मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक
Representational Image | (Photo Credits: PTI)

सध्या देशभरात मुलींसोबत गैरवर्तनाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. याच स्थितीत गोवा पोलिसांनी एका शिक्षकाला 5 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना सरकारी शाळेतील असून पोंडा जिल्ह्यात घडली आहे. गोवा पोलिस अधिक्षक अरविंद गवस यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी असे सांगितले आहे की, मनोज फडते असे आरोपीचे नाव असून त्याने शाळेतील 5 मुलींसोबत विनयभंग केला आहे. या प्रकरणी पीडित मुलींनी लैगिंक शोषण संबंधित एका संस्थेत त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

त्यानंतर शाळेच्या समितीकडून आरोपी शिक्षकाच्या विरोधात अधिक तपास सुरु केला असता पीडित तरुणींच्या बोलण्यात तथ्य असल्याचे समोर आले. यावर आरोपी शिक्षकाच्या विरोधात एफआयआर दाखल करत कलम 354 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

तर काही दिवसांपूर्वी चुंबन घेण्यास नकार दिला म्हणून मित्राने 18 वर्षीय विद्यार्थिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली. आरोपी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकाच कॉलेजमध्ये शिकत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ही घटना मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील बिजापूर गावात घडली आहे. या घटनेने संपुर्ण परिसरात खळबळ उडाली होती.