सध्याच्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामध्ये अनेक कंपन्यांनी अनेक औषधे-गोळ्या बाजारात आणली आहेत. आता ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स (Glenmark Pharma) एक नेजल स्प्रे (Nasal Spray) घेऊन येत आहे. कंपनीने दावा केला आहे की त्यांचा नेजल स्प्रे हा कोरोना उपचारात अतिशय प्रभावी आहे. आता कंपनी या नेजल स्प्रेच्या तिसर्या टप्प्याची चाचणी घेणार आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात, नेजल स्प्रेची आयात आणि मार्केटिंगसाठी औषध नियामकांकडून आपत्कालीन मंजुरीची मागणी केली होती. मात्र औषध नियामकांच्या अधीन असलेल्या विषय तज्ञ समितीने (एसईसी) ग्लेनमार्कला तिसऱ्या टप्प्याची चाचणी घेण्याची शिफारस केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्लेनमार्क कंपनीने कॅनेडियन कंपनी सनोटाइझशी (Sanotize) हातमिळवणी केली आहे. कंपनीने म्हटले आहे की ते इतर उत्पादनांच्या इन-लायसेंसिंगसाठी मूल्यांकन करत राहतील. कंपनीने असेही म्हटले की, कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये कंपनीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांचे औषध फॅबीफ्लू (Fabiflu) हे सौम्य ते मध्यम कोरोना व्हायरस उपचारांसाठी विकसित केले गेले आहे. या औषधाला डॉक्टर आणि रूग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कॅनेडियन कंपनी सनोटाइझ आणि इतरांशी केलेल्या भागीदारीबद्दल बोलताना ग्लेनमार्क म्हणाले, 'आम्ही सनोटाइझसह इतर कंपन्यांशी भागीदारी करण्याचा प्रयत्न करीत आहोत, जे भारतीय जनतेचे कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यास आणि आपल्या समाजावर या महामारीचा होणारा परिणाम कमी करण्यास मदत करू शकतील.
सनोटाइझ कंपनीने इतर अनेक देशांमध्ये आपले नेजल स्प्रे सादर केले आहेत. नेजल स्प्रे हा वरच्या वायुमार्गात विषाणू नष्ट करण्याचे काम करतो. तसेच कोविड-19 ट्रान्समिशनमध्ये अँटीव्हायरल उपचारात प्रभावी असल्याचा दावा करते. दरम्यान, याआधी पंतप्रधानांनी सांगितले होते की, भारतात नेजल स्प्रेवर संशोधन केले जात आहे. जर हे संशोधन यशस्वी झाले तर भारतातील लसीकरण मोहिमेस अजून वेग येण्यास मदत होईल.