अयोध्येत राम मंदिर उभारणीबाबतच्या हालचालींनी वेग घेतला असून, विश्व हिंदू परिषदेने मंदिर उभारणीसाठी सुमारे ७० ट्रक दगडांची ऑर्डर दिल्याचे वृत्त आहे. शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राम मंदिर उभारणीबाबत मागणी करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'कायदा करुन राम मंदिर उभारावे', अशी मागणी केली. तर, दुसऱ्या बाजूला मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या शिवसेना दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हीच मागणी लावून धरली. दरम्यान, येत्या २५ ऑक्टोंबरला आपण अयोध्या दौऱ्यावर जात असून, अयोध्येत अद्याप राम मंदरि का उभा राहू शकले नाही, असा जाब पंतप्रधान मोदींना विचारु असे म्हटले होते.
दरम्यान, आरएसएस सरसंघचालक आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्यांनतर अयोध्येतील वातावरण कमालीचे बदलल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अयोध्येत पर्यटक आणि कारसेवकांची संख्या हळूहळू लक्षणीयरित्या वाढू लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पुजारी आणि भक्तांकडूनही या पर्यटक आणि कारसेवकांचे स्वागत प्रभू रामचंद्रांची भजने गावून केला जात आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेने सुमारे ७० ट्रक दगडांची ऑर्डर दिल्याचीही जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. (हेही वाचा, जमत नसेल तर, तसं सांगा! राम मंदिर आम्ही उभारु; उद्धव ठाकरेंचा घणाघात, अयोध्या दौऱ्याचीही केली घोषणा)
नवभारत टाईम्सने याबाबत वृत्त दिले असून, या वृत्तात विश्व हिंदू परिषदेकडून राम मंदिर उभारणीच्या कामाला गती दिली जात आहे. राम मंदिराचे प्रस्तावीत मॉडेल त्यांच्या नजरेसमोर असून, सर्वोच्च न्यायालयात २९ ऑक्टोबरला रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादावर होणाऱ्या सुनावनीकडे सर्वांचे लक्ष लागल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, ७० ट्रक दगडांच्या ऑर्डरसोबतच अनेक कारागिरांसोबतही बोलणे सुरु असल्याचा उल्लेख नवभारत टाईम्सने आपल्या वृत्तत केला आहे.