ओमायक्रॉन (Omicron) या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) नवीन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे देशात पहिला मृत्यू झाला आहे. केंद्राने बुधवारी राजस्थानमध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, राजस्थानमधील उदयपूर येथील 72 वर्षीय व्यक्तीच्या नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन स्ट्रेनची लक्षणे आढळून आली, ज्याचा मृत्यू झाला.
राजस्थानमधील हा मृत्यू भारतामधील ओमायक्रॉनचा पहिला मृत्यू ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी उदयपूर येथील रुग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा रुग्ण गेल्या 17 वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त होता आणि त्यामुळे त्याची प्रकृती अजून बिघडली. उदयपूर सीएमएचओ डॉ. दिनेश खराडी यांनी सांगितले होते की वृद्ध व्यक्तीचा मृत्यू पोस्ट-कोविड न्यूमोनियामुळे झाला. त्याच्या मृत्यूनंतर तो ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जागतिक स्तरावर आतापर्यंत ओमायक्रॉनशी संबंधित 108 मृत्यूंची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले की, देशात आणि जगात कोरोना विषाणू आणि त्याचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. भारतात आज कोरोना विषाणू संसर्गाची 2,14,000 सक्रिय प्रकरणे आहेत. त्याच वेळी, जगभरात दररोज 17.62 लाख प्रकरणे नोंदवली जात आहेत. 29 डिसेंबर रोजी देशात केस पॉझिटिव्ह 0.79% होती, ती आता 5.03% झाली आहे. केसेसमध्ये 6 पट वाढ आणि पॉझिटिव्ह रेटमध्ये 6 पट वाढ नोंदवली गेली आहे. (हेही वाचा: ओमिक्रॉन डिटेक्टिंग RT-PCR चाचणी किट 4 तासात देणार निकाल, DCGIकडून मिळाली मान्यता - आरोग्य मंत्रालय)
दरम्यान, महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 26,538 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात 8 मृत्यू झाले असून, 5,331 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये 87,505 सक्रीय रुग्णाच्यावर उपचार सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे, राज्यातील ओमायक्रॉन प्रकरणाची संख्या 797 वर पोहोचली आहे. यातील 330 रुग्ण बरे झाले आहेत.