राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करताना आता वाहनचालकांना येत्या 1 डिसेंबर पासून फास्टॅग (FasTag) सोबत ठेवणे अनिवार्य करण्यात येणार आहे. तर टोल नाक्यावर रोख रक्कमेच्या माध्यमातून आता डिसेंबर महिन्यापासून टोल स्विकारला न जाता तो फास्टॅगच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. त्यामुळे चार चाकींसह अन्य वाहनांना सुद्धा फास्टॅग घेणे अनिवार्य असून त्यांनी तो बसवून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम यांनी हा नवा नियम लागू होईल असे म्हटले आहे.सर्व वाहनचालकंना फास्टटॅग बारकोड मिळावा यासाठी देशभरातील 800 पेट्रोल पंपांचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार आहे. तर जाणून घ्या फास्टॅग म्हणजे काय आणि त्याचा वापर केल्यास काय फायदे होणार आहेत.
>>फास्टॅग बारकोड आणि फास्टटॅग लेन फायदे
-टोल भरण्यासाठी वाहनचालकांचा जाणारा वेळ वाचणार
-टोल नाक्यांवर होणारी वाहनाची रहदारी कमी होणार
-एखाद्या चालकाने नियम मोडत घुसखोरी केल्यास दंडाची तरतूद
(वाहनचालकांनो सावधान! फास्टटॅग नसल्यास 30 नोव्हेंबर नंतर स्विकारला जाईल दुप्पट टोल)
>>काय आहे फास्टॅग
हे एकप्रकारचे बारकोड स्टिकरच आहे. जे वाहनांना लावले जाईल. यात तुमचा कोड बँक खाते किंवा पेटीएम खात्याशी लिंक केलेले असेल. आजवर तुम्ही टोल नाक्यावर गाडी थांबवून टोल भरत होतात. आता तुम्हाला रोख पैसे देण्याची गरज नाही. फास्टटॅगयुक्त वाहने टोलच्या एंट्री गेटवर जाताच गेटवरील सेन्सर फास्टॅग स्कॅन करून त्याची माहिती कंट्रोल रूमला देतो. ऑनलाइन टोल भरून बॅरिअर उघडले जाते. ज्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे.