Rakesh Tikait | (Photo Credits: X)

शेतकरी प्रश्नावर केंद्र सरकारला अद्यापही तोडगा काढता आला नाही. त्यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्यातील बोलणी अनेकदा फिसकटली आहेत. परिणामी शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून आंदोलन (Farmers Protest) तीव्र करण्याच्या विचारात आहेत. आंदोलनाचा एक भाग असलेला संयुक्त किसान मोर्चा (Samyukta Kisan Morcha) ने 26 फेब्रुवारी (सोमवार) रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली आहे. ते 14 मार्चला रामलीला मैदानावर भव्य रॅलीही काढणार आहेत. दुसऱ्या बाजूला खनौरी सीमेवर पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याच संघर्षावेळी 12 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

पोलिसांसोबत शेतकऱ्यांचा संघर्ष, एकाचा मृत्यू

खनौरी सीमेवर पोलिसांसोबत झालेल्या संघर्षामध्ये शेतकऱ्याने प्राण गमावल्यानंतर शेतकरी आंदोलन दोन दिवस स्थगित ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान,रविवारी रात्री तीन केंद्रीय मंत्र्यांच्या पॅनेलसह चौथ्या फेरीच्या चर्चेतही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन दिवसांच्या शांततेनंतर सकाळी पुन्हा आंदोलन सुरू केले. आंदोलकांच्या गटांना पांगवण्यासाठी पोलिसांनी दोन सीमा बिंदूंवर अनेक वेळा अश्रुधुराची नळकांडी फोडली. शेतकऱ्यांनी बॅरीकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी ही कारवाई, केल्याचे समजते. आदल्या दिवशी केंद्रीय मंत्र्यांपैकी कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांना पुढील चर्चेसाठी बोलावले आणि आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. खनौरी आणि शंभू येथे हजारो शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ट्रकसह त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत, ज्यात पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) कायदेशीर हमी आणि शेतकरी कर्जमाफीचा समावेश आहे. (हेही वाचा, Farmers Protest: शेतकरी आंदोलनात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, हरियाणा सीमेवर अनेक जण जखमी)

व्हिडिओ

आंदोलनाला वाढता पाठिंबा

शेतकरी नेते बलदेव सिंग सिरसा यांनी मृत शेतकऱ्याचे नाव सुभकरण सिंग (21) असून, तो पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील बालोके गावचा रहिवासी असल्याचे म्हटले आहे. पटियाला येथील राजिंद्र रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक एचएस रेखी यांनी पत्रकारांना सांगितले की, तीन जणांना (त्यापैकी एक मृत) खनौरी येथून रुग्णालयात आणले होते. मृताच्या डोक्याला दुखापत झाली असून इतर दोघांची प्रकृती स्थिर आहे. पोस्टमॉर्टमनंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल, असेही ते म्हणाले. हरियाणा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाबच्या संगरूर जिल्ह्यात हरियाणाच्या जिंदच्या सीमेजवळ असलेल्या खनौरीमध्ये त्यांच्यावर लाठी आणि दगडफेक करण्यात आल्याने सुमारे 12 पोलिस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, शेतकरी आंदोलन हळूहळू विराट रुप धारण करत आहे. या शेतकऱ्यांना मिळणारा पाठींबा हळूहळू देशभरातून वाढतो आहे. त्यामुळे सरकारसमोरही पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.