Enforcement Directorate: प्रसारमाध्यम समूह दैनिक भास्कर सोबतच उत्तर प्रदेशमधील अनेक वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयावर ईडीचे छापे
Enforcement Directorate | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मीडिया ग्रुप दैनिक भास्‍कर (Media group Dainik Bhaskar) च्या देशभरातील कार्यालयांमध्ये अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अधिकाऱ्यांनी गुरुवारी (22 जुलै) धाडी टाकल्या. भास्कर समूहावर करचोरी केल्याचा आरोप आहे. वृत्तसंस्था आयएनएसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र आदी ठिकाणच्या कार्यालयांवर छापे टाकत शोधमोहीम राबवली. या समूहाच्या चालकांच्या घरावर आणि कार्यालयांवरही इडीने छापेमारी केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भास्कर समूहाच्या जयपूर, अहमदाबाद, भोपाळ आणि इंदौर येथील कार्यालयांवर छापेमारी केल्याचे समजते.

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील एक वृत्तवाहीणी, भारत समाचार (Bharat Samachar) च्याही काही ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या एका पथकाने लखनऊ येथील कार्यालय आणि संपादकांच्या घराची झडती घेतली. करचोरी प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. (हेही वाचा, ED Raids Anil Deshmukh’s House in Katol: अनिल देशमुख यांच्या काटोल जवळील मूळ गाव वडवीरा येथील घरावर ईडीचा छापा)

दरम्यान, प्रसारमाध्यम समूहावर होत असलेल्या छापेमारीवरुन उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका होत आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की, भास्कर ग्रुपने सरकारवर 'कोविड गैरव्यवस्थापन' (Covid "mismanagement)' मुद्द्यावरुन केलेल्या वार्तांकन केले होते. त्यामुळेच सरकारने ही कारवाई केली आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'आपल्या वार्तांकनाच्या माध्यमातून दैनिक भास्करने मोदी सरकारच्या कोविड-19 महामारी गैरव्यवस्थापनास उजेडात आणले होते. त्याचीच किंमत त्यांना चुकवावी लागत आहे. देशात अघोषीत आणीबाणी लागू करणयात आली आहे.' माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी ही एक मॉडिफाइड इमरजेंसी (Modified Emergency) असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, पत्रकार आणि प्रसारमाध्यमांवरील हल्ला म्हणजे लोकशाही दडपण्याचा क्रूर प्रयत्न आहे.