ED Raids Anil Deshmukh’s House in Katol: अनिल देशमुख यांच्या काटोल जवळील मूळ गाव वडवीरा येथील घरावर ईडीचा छापा
Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook)

राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मूळ गावी असलेल्या घरावर अंमलबजावणी संचालयाने (Enforcement Directorate) छापा टाकला आहे. अनिल देशमुख यांचे हे घर नागरपूर (Nagpur District) जिल्ह्यातील काटोल (Katol) जवळ येथे आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केले आरोप आणि मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात त्यांची ईडी द्वारे चौकशी सुरु आहे. ईडीचे एक पथक नागपूर येथील अनिल देशमुख यांच्या मूळ गावी पोहोचले आहे. हे गाव नागपूर पासून 100 किलोमीटर दुर आहे. वडवीरा (Vad Vihira) असे या गावाचे नाव आहे.

दरम्यान, या आधी इडीने अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची 4.20 कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे. यात मुंबई येथील वरळी परिसरातील एका घराचाही समावेश होता. प्राप्त माहितीनुसार ईडीने पीएमएलए प्रकरणी ही कारवाई केली. जप्त संपत्तीत मुंबई येथील एका फ्लॅटसह रायगड येथील त्यांच्या 2.67 कोटी रुपयांच्या जमीनीचाही समावेश आहे. (हेही वाचा, अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर भाजप नेते प्रविण दरेकर, किरीट सोमय्या यांच्या प्रतिक्रीया (Watch Videos))

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात आरोप केला होता की, देशमुख यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री पदावर असताना बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या माध्यमातून मुंबई येथील बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून प्रतिमहिना 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, विशेष पीएमएल न्यायालयाने 6 जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन सहाय्यकांना मंगळवारी 20 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. देशमख यांच्या विरुद्ध 100 कोटी रुपयांची लाच माहितल्याच्या आरोप प्रकरणी चौकशी सुरु आहे. हे प्रकरण आता इडीकडे सोपविण्यात आले आहे.