Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 संकट (Covid-19 Pandemic) काळात विमानसेवेवर घालण्यात आलेली मर्यादा आता हळूहळू हटवण्यात येत आहे. आज (11 नोव्हेंबर) सरकारने उड्डाण संचालन क्षमता 70 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. सध्या विमान कंपन्या त्यांच्या क्षमतेच्या 60 टक्क्यांपर्यंत काम करू शकतात. मात्र आता ही क्षमता 70% करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी (Civil Aviation Minister Hardeep Singh Puri) यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊननंतर 25 मे रोजी जेव्हा सर्वप्रथम विमानसेवा सुरु करण्यात आली तेव्हा 30,000 प्रवासी क्षमता होती आणि आता 8 नोव्हेंबर पर्यंत ती 2.06 लाखांवर पोहचली आहे. देशांतर्गत विमानसेवेची क्षमता 60% वरुन 70% पर्यंत वाढवण्यात येत असल्याचे आज पुरी यांनी सांगितले.

या महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून विमान तिकीट भाडेवाढीची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान आता नागरी उड्डाण मंत्रालयाने 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत भाडेवाढीची मूदत वाढवली आहे. ही भाडेवाढ या वर्षाच्या 21 मे पासून लागू करण्यात आली होती. प्रवासाच्या अंतरावरुन सात फेअर बँड लागू करण्यात आले आहेत. 40 मिनिटांच्या प्रवासासाठी पहिला बँड, इतर फेअर बँड 40-60 मिनिटे, 60-90 मिनिटे, 90-120 मिनिटे, 120-150 मिनिटे, 150-180 मिनिटे आणि 180-210 मिनिटांच्या उड्डाण कालावधीसाठी लागू आहेत. (Ban on International Flights Extended: आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील निर्बंध 30 नोव्हेंबर पर्यंत कायम- DGCA)

ANI Tweet:

1 नोव्हेंबरला रोजची प्रवाशांची संख्या 2.05 लाखांवर पोहचली होती. यावर्षी मे महिन्यात देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली तेव्हा विमान कंपन्यांना सामान्य क्षमतेच्या 33 टक्के पर्यंत उड्डाण करता येत होते. ही क्षमता 26 जूनपासून 45 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आणि 2 सप्टेंबरपासून ती 60 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.