यंदा दिवाळीत (Diwali) फटाक्यांच्या (Firecrackers) किंमतीत 5 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. फटाक्यांच्या उत्पादन किंमतीत झालेली वाढ आणि मर्यादीत पुरवठा यामुळे फटाक्यांच्या किंमती वाढणार आहेत. फटाक्यांची किंमती यंदा 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. फटाक्यांसाठी लागणाऱ्या कच्चा मालाची किंमत वाढल्यामुळे फटाक्यांच्या किंमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती एका फटाके विक्रेत्याने दिली आहे.
मागील वर्षी कोरोनाचे संकट दाट असतानाही फटाक्यांच्या खरेदीमध्ये कोणतीही घट दिसून आली नाही. दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीच बाजारातील सर्व फटाके संपले होते. या वर्षीही फटाक्यांमुळे चांगली कमाई होईल, असा विश्वास विक्रेत्यांना आहे. सुमारे 100 ते 150 कोटी रुपये फटाक्यांच्या विक्रीतून मिळतील, अशी अपेक्षा आहे. (Delhi: राजधानी दिल्लीमध्ये 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाके विक्री आणि फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश)
यापूर्वी फटाक्यांच्या किंमतीत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, फटाक्यांच्या उत्पादन किंमतीत झालेली वाढ आणि मर्यादीत उपलब्धतेमुळे फटाक्यांची किंमत 5 ते 10 टक्क्यांनी वाढण्यात येईल, अशी माहिती चेन्नई फायरवर्क्स डिलर वेलफेअर असोसिएशनचे प्रेसिडेंट टीएस काझा मोहिदीन यांनी दिली. तसेच फटाक्यांच्या वापरामुळे आग लागण्याची भीती असते त्यामुळे अग्निशमन विभागाचे डिरेक्टर डीजीबी करण सिंघा यांनी आपल्या अग्निशमन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
दरम्यान, इंधर दर, घरगुती गॅस दर यांच्यात सातत्याने होणारी वाढ आणि दैनंदिन जीवनातील महागलेल्या वस्तू यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. यातच सणासुदीच्या काळात फटाक्यांच्या किंमतीही वाढणार असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना नक्कीच बसणार आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 5.3 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे.