कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांच्या लॉक डाऊन (Lockdown) दरम्यान, आसाम (Assam) आणि मेघालय (Meghalaya) या राज्यांमध्ये सर्व दारूची दुकाने, दारूची गोदामे, बॉटलिंग प्लांट, डिस्टिलरीज आणि ब्रूअरी सुरु राहणार आहेत. सोमवारी (13 एप्रिल 2020) पासून या दोन्ही राज्यात दारूविक्री सुरु होत आहे. ही दुकाने दिवसातील केवळ सात तासच उघडतील. रविवारी उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशानुसार या संदर्भात माहिती देण्यात आली. अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त एस. मेधी यांना लिहिलेल्या पत्रात, सर्व उपायुक्तांना सांगण्यात आले आहे की, राज्य सरकारने 13 एप्रिलपासून दारूची दुकाने उघडण्यास मान्यता दिली आहे.
आसाम राज्यातील दारूची दुकाने निश्चित दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत खुली असतील. अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, दुकानामध्ये कमीतकमी कर्मचारी काम करतील. तसेच ग्राहकांनाही हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करुन दिले पाहिजेत. सोबतच सामाजिक अंतराच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. दुसरीकडे, मेघालयातील वाईन दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत खुली असतील. येथील उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रवीण बक्षी म्हणाले की, एका घरातील फक्त एका व्यक्तीलाच दारूच्या दुकानात खरेदीसाठी येऊ दिले जाईल. मात्र एका गावातून दुसर्या गावात दारू घेऊन जाण्यावर किंवा फिरण्यास बंदी असेल.
ज्या ठिकाणी दारूची दुकाने नाहीत अशा ठिकाणी जिल्हा उपायुक्त यांनी ठरवलेल्या नियमांनुसार होम डिलिव्हरी करता येईल, असेही अधिसूचनेत म्हटले आहे. यापूर्वी पंतप्रधानांनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर, 24 मार्चपासून आसाम आणि मेघालयात दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. (हेही वाचा: 65 वर्षीय व्यक्तिचा सायकलवरुन 130 किलोमीटर प्रवास; कर्करोगग्रस्त पत्नीच्या Chemotherapy उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा)
आसाममध्ये दारूची दुकाने सुरू झाल्यावर सोमवारी सकाळीच अनेक दारूच्या दुकानांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. राज्य सरकारने राज्यात दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर, लोकांनी सकाळी दारूच्या दुकानासमोर रांगा लावण्यास सुरुवात केली.