Deposit Cash at ATMs Using UPI: आता खात्यात पैसे जमा करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही; युपीआयद्वारे एटीएममध्ये भरू शकता रोख रक्कम
(Photo Credits: AIR/ Twitter)

आता तुम्ही युपीआयद्वारे एटीएम (ATM) मधून पैसे काढू शकता व लवकरच तुम्ही युपीआयच्या मदतीने एटीएममध्ये रोख रक्कम देखील जमा करू शकाल. म्हणजेच तुमच्या खात्यात रोख रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही. तुम्ही हे काम युपीआयचा वापर करून कॅश डिपॉझिट मशीन (CDM) द्वारे करू शकाल. सध्या केवळ डेबिट कार्डचा वापर सीडीएमद्वारे रोख रक्कम जमा करण्यासाठी केला जातो. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मात्र दास यांनी ही सुविधा कधी सुरू होईल याची कोणतीही विशिष्ट तारीख दिलेली नाही.

चलनविषयक धोरणाची घोषणा करताना शक्तीकांत दास म्हणाले की, आगामी काळात डेबिट कार्ड तसेच युपीआयद्वारे कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करता येतील. सध्या युपीआयद्वारे एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कॅशलेस सुविधा वापरून सहज पैसे काढू शकता.

शक्तिकांत दास म्हणाले की, यूपीआयची लोकप्रियता पाहता आता त्याद्वारे रोख रक्कम जमा करण्याची सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे. बँकांनी बसवलेल्या कॅश डिपॉझिट मशीनमुळे ग्राहकांची सोय तर वाढतेच पण बँक शाखांवरील रोख हाताळणीचा भारही कमी होतो. रोख ठेवी सुलभ करण्यासाठी ऑपरेशन निर्देश लवकरच जारी केले जातील. यासह किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सेंट्रल बँक एक ॲप लॉन्च करणार आहे. दास म्हणाले की, आरबीआय लवकरच रिटेल डायरेक्टमध्ये ॲप लॉन्च करेल. याद्वारे गुंतवणूकदार थेट आरबीआयकडे सरकारी रोख्यांमध्ये सहज गुंतवणूक करू शकतात. (हेही वाचा: Income Tax Returns for AY 2024-25: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाद्वारे सामान्यपणे वापरले जाणारे आयटीआर दाखल करण्याची सुविधा 1 एप्रिल 2024 पासून उपलब्ध)

दरम्यान, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPIs) कार्ड धारकांना बँक खातेदारांप्रमाणे थर्ड पार्टी युपीआय ॲप्सद्वारे युपीआय पेमेंट करण्याची परवानगी देण्याचाही प्रस्ताव आहे. सध्या, पीपीआयद्वारे युपीआय पेमेंट हे केवळ पीपीआय कार्ड जारीकर्त्याद्वारे प्रदान केलेल्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपचा वापर करून केले जाऊ शकते.