Delhi Vidhan Sabha Election Results 2020: राजधानी दिल्लीत 'अब की बार किसकी सरकार?' अरविंद केजरीवाल विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी सामन्याचा आज लागणार निकाल
दिल्ली विधानसभा निवडणूक (File Image)

Delhi Assembly Election Results 2020: दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल 2020 आज जाहीर होत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी थोड्याच वेळात सुरु होत आहे. आज (मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020) सकाळी 8 वाजलेपासून प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होत आहे. निवडणूक आयोगाने या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रांवर सुसज्ज यंत्रणा उभारली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal यांचा आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप आणि काँग्रेस असा सामना रंगला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेसुद्धा या निवडणूक प्रचारात उतरल्याने हा सामना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह असा सामना रंगला आहे. राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष फारसा दमदारपणे प्रचार करताना दिसला नाही. दरम्यान, मतमोजणी केंद्रांवर विविध पक्षाचे कार्यकर्ते पोहोचले असून, निकालाबाबत उत्सुकता आहे.

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर इव्हीएममध्ये असलेल्या मतांची मोजणी आणि त्यानंतर पेपर ट्रेल मशीनीद्वारे मोजल्या जाणाऱ्या चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल. मतमोजणी सुरु झाल्यानंर सुरुवात प्राथमिक कल हाती येतील. त्यात कोणत्या मतदारसंघातून कोणता उमादवार आघाडीवर आहे हे समजू शकेल. (हेही वाचा, Delhi Assembly Election Results 2020: दिल्ली विधानसभा निवडणूक निकालापूर्वी आप नेते मनिष सिसोदिया यांनी घेतले वरिष्ठांचे आशिर्वाद)

दरम्यान, 8 फेब्रुवारीला एकूण 70 जागांसाठी दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण 672 उमेदवारांनी जनमताचा कौल आजमावला. ज्याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत 62.59% मतदान झाले. हे मतदान पार पडल्यानंतर विविध संस्था आणि प्रसारमाध्यमसमूह यांचे एक्झिट पोल्सही जाहीर झाले. एक्झिट पोल्सनी वर्तवलेल्या अंदाजांनुसार आम आदमी पक्ष सत्तेत पुन्हा एकदा पुनरागमन करणार अशी शक्यता वर्तवली आहे. तर भाजप क्रमांक दोनवर राहू शकेल असा अंदाज आहे. काँग्रेस बाबत कोणत्याच एक्झिट पोलने बरा अंदाज व्यक्त केला नाही. त्यामुळे आज जनमताचा कौल कोणाला मिळतो याबाबत उत्सुता आहे.