टोमॅटोचे दर 80 रुपये प्रति किलोवर पोहचल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री, सरकारने घेतला मोठा निर्णय
Tomato (Photo Credits-Facebook)

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढले होते. त्यानंतर आता टोमॅटोचे दर वाढल्याने सामान्यांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे वाढत्या दर वाढीवर लगाम घालण्यासाठी सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. देशातील विविध ठिकाणी टोमॅटोचे दर 80 रुपये प्रति किलो झाले आहेत. यामुळे जेवणात टोमॅटो आता वापरायचा की नाही यावर आता प्रश्न उपस्थित राहिला आहे.

देशाची राजधानी दिल्ली येथे टोमॅटोचा तुटवडा भरुन काढण्यासाठी शु्क्रवार पासून सफलच्या आउटलेटमध्ये स्वस्त दरात टोमॅटो उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सरकारने एक पथक तयार केले असून त्यानुसार साठवून ठेवलेल्या टोमॅटोवर लगाम लावण्यात येणार आहे. सफलच्या आउटलेटमध्ये 25 रुपयात 200 ग्रॅम टोमॅटो प्युरीचे पॅक मिळणार असून ते 800 ग्रॅम टोमॅटोच्या बरोबर आहे. टोमॅटो प्युरीमधील सर्वात मोठा पॅक 825 ग्रॅमचे एक पॅक 85 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. जे 2.5 किलो टोमॅटोबरोबरचा असणार आहे. याबाबत अधिक माहिती केंद्रीय उपभोक्ता मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या एका विधानात म्हटले आहे.(कांद्यानंतर आता टोमॅटोच्या दरात भाव वाढ, नागरिक त्रस्त)

तर कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत असे सांगण्यात आले की, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे सातत्याने पाऊस झाल्याने त्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. मात्र पावसाळा अद्याप काही ठिकाणी सुरु असून तो ओसरल्याच्या 10 दिवसात टोमॅटोचे दर कमी होणार आहेत. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल आणि आंध्र प्रदेश येथे टोमॅटोची निर्यात वाढवण्यासोबत त्यांना नियमित पुरवठा केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.