कांद्यानंतर आता टोमॅटोच्या दरात भाव वाढ, नागरिक त्रस्त
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. नुकत्याच झालेल्या नवरात्रौत्सव आणि दसऱ्यानंतर आता दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच स्थितीत आता भाज्यांचे दर गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्यांच्या दरात मोठी वाढ झालेली दिसून आली. पण आता कांद्यानंतर टोमॅटोचे दर वाढत आहेत.

दिल्ली (Delhi) येथे टोमॅटोचे खरेदी दर 80 रुपये प्रति किलो झाले आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांना टोमॅटो आता 80 रुपयांना विकले जात आहेत. कांद्यानंतर टोमॅटो दर वाढीमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. एका टोमॅटो विक्रेत्याने पीटीआय यांच्यासोबत बातचीत केली असता त्याने दरात वाढ होण्यामागील कारण सांगितले आहे. त्यांनी असे सांगितले की, दक्षिण कर्नाटक आणि तेलंगणा सारख्या राज्यात पावसामुळे टोमॅटोच्या शेतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच त्याची आवक घटल्याने किंमतीत वाढ झाली आहे. परंतु टोमॅटोच्या दरात घट कधी होईल हे त्यांनी स्पष्ट केले नाही.(केंद्र सरकार करणार 2000 टन कांद्याची आयात; लासलगाव बाजारातील तुटवडा भरून काढण्यासाठी नवा मार्ग)

रिपोर्टनुसार, टोमॉटोच्या दराबाबत बोलायचे झाल्यास दिल्लीत 1 ऑक्टोंबरला त्याचे दर 45 रुपये किलोवरुन 54 रुपये प्रति किलो झाले आहेत. तसेच मदर डेअरीच्या सफल आउटलेटमध्ये टोमॅटो 58 रुपये प्रति किलोने विकले जात आहे. तर अन्य ठिकाणी 60 ते 80 रुपयांपर्यंत त्याचे दर पोहचले आहेत. कोलकाता येथे 60 रुपये प्रति किलो टोमॅटो आणि मुंबईत 54 रुपये दर झाले आहेत.

तसेच यंदाच्या पावसामुळे कांदा उत्पादनावर बराच प्रभाव पडला. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील लासलगाव कांदा बाजारात देखील प्रति शंभर किलो मागे 1000 रुपये दराने कांदा विकला गेला होता.तरीही लासलगाव बाजारात कांद्याच्या भावात झालेली दरवाढ ही मागील काही दिवसात स्थिररूपात झाली आहे. तर दुसरीकडे कर्नाटक राज्यातील काही भागात अति पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने कांद्यासह अन्य उत्पादनांचे भाव देखील वधारले होते. साहजिकच यामुळे मुंबई, दिल्ली सह अनेक मुख्य शहरात देखील नागरिकांना या किमतीचा फटका बसला.