Delhi New Chief Minister: दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election 2025) भारतीय जनता पक्षाने (BJP) 27 वर्षांनंतर सत्ता मिळवली आहे. भाजपाने 70 पैकी 48 जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्ष 22 जागांवर मर्यादित राहिला. अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघात भाजपाचे प्रवेश वर्मा यांनी पराभूत केले. तसेच, आपचे मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि सौरभ भारद्वाजसारखे इतर नेतेही त्यांच्या मतदारसंघात पराभूत झाले. या विजयामुळे भाजपाला दिल्लीच्या राजकारणात मोठे यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल दिल्लीतील मतदारांचे आभार मानले आहेत. आपच्या पराभवाचे एक कारण काँग्रेसच्या मतविभाजनाला मानले जात आहे, ज्यामुळे भाजपाला फायदा झाला. या निकालांमुळे दिल्लीच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे, कारण 1989 पासून भाजपाला येथे सत्ता मिळालेली नव्हती.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पक्षाने अजूनतरी दिल्ली मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा जाहीर केला नाही. आता दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्याबद्दल चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काही प्रमुख नावांची चर्चा होत आहे-
प्रवेश साहिब सिंग वर्मा: पश्चिम दिल्लीचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र प्रवेश वर्मा यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. त्यांची दिल्लीतील राजकारणात चांगली पकड आहे.
मनोज तिवारी: उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार आणि भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांचे नावही चर्चेत आहे. त्यांनी पूर्वी दिल्ली भाजपाचे अध्यक्षपद भूषविले आहे. (हेही वाचा: Delhi Election Results 2025: दिल्ली निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदी पोहोचले भाजप मुख्यालयात; कार्यकर्त्यांचे मानले आभार)
बन्सुरी स्वराज: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची कन्या बन्सुरी स्वराज यांचे नावही चर्चेत आहे. त्या सध्या वकील म्हणून कार्यरत आहेत आणि भाजपाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.
विजेंदर गुप्ता: भाजपचे विद्यमान आमदार आणि दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंदर गुप्ता यांनी रोहिणी मतदारसंघातून विजय मिळवला आणि त्यांनी आपचे प्रदीप मित्तल यांचा पराभव केला. त्यांनी दिल्ली भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
वीरेंद्र सचदेवा: वीरेंद्र सचदेवा हे दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 23 मार्च 2023 रोजी ही भूमिका स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुका लढवल्या आणि बहुमत मिळवले.
दुष्यंत गौतम: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी ते भाजपचे प्रमुख उमेदवार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि दलित चेहरा असल्याने त्यांना एक मजबूत उमेदवार मानले जात आहे. गौतम यांनी राज्यसभेचे खासदार म्हणूनही काम केले आहे आणि विद्यार्थी राजकारणात सक्रिय आहेत.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. लवकरच अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. भाजपसाठी मुख्यमंत्र्यांचे नाव निवडणे इतके सोपे नाही. कारण या रांगेत अनेक मोठे आहेत. दरम्यान, दिल्ली केंद्रशासित प्रदेश असल्याने, मुख्यमंत्र्यांच्या नावासाठी राष्ट्रपतींची मान्यता आवश्यक आहे. एकदा पक्षाने मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवले की, भारताचे राष्ट्रपती उपराज्यपालांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. या प्रक्रियेला 2 ते 3 दिवस लागू शकतात. दुसरीकडे, पंतप्रधान मोदी 12-13 फेब्रुवारी रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एका महत्त्वाच्या बैठकीसाठी अमेरिकेला जाणार आहेत. याआधी ते फ्रान्सलाही भेट देतील. पंतप्रधान मोदी अमेरिकेहून परतल्यानंतर हा शपथविधी सोहळा होईल असे मानले जात आहे.