दीपिका त्या लोकांसोबत उभी आहे, जे लोक देशाचे तुकडे करु इच्छितात : स्मृती इराणी
Smriti Irani (Photo Credit: ANI)

Smriti Irani comments on Deepika Padukone: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराविरोधात देशभरातच नाही तर बॉलिवूडमधूनही अनेक कलाकारांनी निषेध व्यक्त केला आहे. सध्याची आघाडीवर असलेली अभिनेत्री दीपिका पादूकोण हिनेही काही दिवसांपूर्वी जेएनयू मध्ये स्वतः उपस्थित राहून विरोधप्रदर्शनात सहभाग घेतला. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केल्या. आता मात्र केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील दीपिकावर टीका करत निशाणा साधला आहे.

एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्या म्हणाल्या, “दीपिका त्या लोकांसोबत उभी आहे, जे लोक देशाचे तुकडे करु इच्छितात. ज्यानेही ही बातमी वाचली असेल (दीपिकाच्या जेएनयूमध्ये जाण्याबाबतची बातमी), त्याला नक्कीच हे जाणून घ्यायचं असेल की ती आंदोलकांमध्ये का गेली? ती त्या लोकांसोबत उभी आहे ज्यांनी मुलींच्या गुप्त अंगावर काठ्यांनी हल्ला केला, हे आमच्यासाठी धक्का बसणारे आहे.”

इतकंच नव्हे तर स्मृती इराणी यांनी दीपिकाच्या पॉलिटीकल इंटरेस्टबद्दलही खुलासा केला. त्या म्हणाल्या, “2011 मध्ये दीपिकाने सांगितलं होतं की, ती काँग्रेस समर्थक आहे”.

या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की जेएनयू विवादावर अजून तपास सुरु आहे. आणि पोलिसांकडून तपासाचा अहवाल जोपर्यंत न्यायालयापुढे सादर होत नाही तोपर्यंत काहीही वक्तव्य करणं योग्य नाही.

JNU Violence: जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिने हिंसाचारापूर्वी 3 तास दिल्ली पोलिसांना माहिती देत मागितली होती मदत; रिपोर्ट

दरम्यान, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये रविवार 5 जानेवारीच्या रात्री हिंसाचार भडकला आणि रातोरात त्याचे पडसाद देशभरात पसरले. या प्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष सह 19 अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.