Representational Image (Photo Credits: Youtube/Screengrab)

देशात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेचा कहर कायम आहे. या साथीच्या आजारामुळे बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, एका रिसर्चमध्ये समोर आले आहे की 2020 मध्ये 8,700 पेक्षा जास्त लोक रेल्वे रुळांवर (Railway Tracks) मरण पावले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की बळी पडलेल्यांपैकी बरेच जण प्रवासी कामगार होते. महत्वाचे म्हणजे, देशव्यापी कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे (Lockdown) प्रवासी रेल्वे सेवा बऱ्याच प्रमाणात कमी केल्या गेल्या आहेत, त्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत.

माहिती अधिकार कायद्यांतर्गत मध्य प्रदेशचे कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात जानेवारी ते डिसेंबर 2020 दरम्यान रेल्वे बोर्डाने अशा मृत्यूची आकडेवारी शेअर केली. रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, ‘राज्य पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान रेल्वे ट्रॅकवर 805 जण जखमी झाले आणि 8,733 जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे की, मृत्यू झालेल्यांपैकी बरेच प्रवासी कामगार होते. यामधील अनेकांनी रेल्वे ट्रॅकवर राहणे निवडले होते. (हेही वाचा: Nestle: Maggi, KitKat, Nescafe खाताय? नेस्ले कंपनीची60% उत्पादनं आरोग्यास अपायकारक; एका अहवालात खुलासा)

तत्पूर्वीच्या चार वर्षांच्या तुलनेत 2020 मध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होते, कारण 25 मार्च रोजी कोरोना व्हायरस लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर प्रवासी सेवा प्रतिबंधित करण्यात आल्या. लॉकडाऊन दरम्यान केवळ मालगाड्या चालू होत्या. प्रवासी सेवा टप्प्याटप्प्याने उघडल्या जात होत्या आणि डिसेंबरपर्यंत 110 नियमित प्रवासी गाड्यांसह सुमारे 1,100 विशेष गाड्या धावत होत्या. 2016 आणि 2019 दरम्यान अशा घटनांमध्ये 56,271 लोक मरण पावले आणि 5,938 जण जखमी झाले.

दरम्यान, अशा प्रकारचे मृत्यू कमी करण्यासाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणात मोहीम राबविली आहे. रेल्वेने पीडित कुटुंबातील सदस्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करत नुकसान भरपाईदेखील दिली आहे.