Cyclone Jawad Live Tracker Map on Windy: बंगालच्या उपसागरात तयार झाले 'जवाद चक्रीवादळ'; रविवारी सकाळी ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता, जाणून घ्या वादळाची सध्याची स्थिती
Cyclone | (Images for symbolic purposes only । Photo Credits: Pixabay)

'जवाद चक्रीवादळ' (Cyclone Jawad) रविवारी सकाळी ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या काही भागात धडकण्याची शक्यता आहे. ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम-मध्य लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा पुढील 12 तासांत चक्री वादळात रुपांतरीत होऊन त्याची तीव्रता वाढेल. चक्रीवादळामुळे दक्षिण बंगालमधील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

IMD च्या सकाळच्या बुलेटिननुसार, खोल दबाव पश्चिम-मध्य आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरावर केंद्रित आहे, जे विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) च्या 580 किमी दक्षिण-दक्षिणपूर्व, गोपाळपूर (ओडिशा) च्या 670 किमी दक्षिण-पूर्व आणि पारादीप (ओडिशा) च्या नैऋत्येस 760 किमी अंतरावर आहे. चक्रीवादळ जवाद पुन्हा मार्ग बदलण्याची (वळण्याची) शक्यता आहे आणि पुरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात धडकण्याची शक्यता आहे, असे विशेष मदत आयुक्त (SRC) पीके जेना यांनी सांगितले.

Cyclone Jawad Live Tracker Map and Cyclone Path on Windy:

जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत असल्याने, ओडिशा सरकारने गुरुवारी संध्याकाळी त्याचे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. राज्यातील बिजू पटनायक यांच्या नेतृत्वाखालील सरकारने किनारी जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनांना कच्ची घरे आणि सखल भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यास सांगितले आहे. चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातून 3 आणि 4 डिसेंबरला जाणाऱ्या सुमारे 65 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: Omicron: देशात कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' व्हेरिएंटमुळे येणार तिसरी लाट? सरकारने दिले स्पष्टीकरण)

गुरुवारी अधिकाऱ्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका  उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ओडिशाने 266 बचाव पथके दक्षिणी किनारपट्टीवर तैनात करण्याची योजना आखली आहे, ज्यात NDRF, राज्य अग्निशमन सेवा आणि ओडिशा आपत्ती जलद कृती दल (ODRAF) च्या संघांचा समावेश असेल.

दरम्यान, जवाद हा अरबी शब्द आहे. याचा अर्थ उदार किंवा दयाळू असणे. सौदी अरेबियाच्या सूचनेवरून हे नाव देण्यात आले आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना या वादळामुळे फारसे नुकसान होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.