Cyber Crime: सीरम इन्स्टिट्यूटची कोट्यावधी रुपयांची फसवणूक; सीईओ Adar Poonawalla असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी मारला डल्ला
Adar Poonawalla | (Photo Credits-Facebook)

कॅशलेस व्यवहारच्या वाढत्या ट्रेंडमुळे मोठ्या संख्येने लोक ऑनलाइन व्यवहार (Online Transaction) करू लागले आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्याची (Cyber Crime) प्रकरणे समोर येत आहेत. गुन्हेगारही लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन डावपेच अवलंबत आहेत. सायबर गुन्हेगार सामान्य लोकांबरोबरच मोठे उद्योगपती, राजकारणी आणि बड्या-बड्या कंपन्यांनाही लक्ष्य करत आहेत. आता सायबर गुन्हेगारांनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी 'कोव्हिशील्ड लस' बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (Serum Institute of India) लक्ष्य केले आहे. सीरमची 1 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी या फसवणुकीसाठी सीईओ अदार पूनावाला यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकाचा वापर केला आहे. या नंबरद्वारे गुन्हेगारांनी सीरम इन्स्टिट्यूटच्या एका संचालकाला व्हॉट्सअॅप संदेश पाठवून त्यांना अनेक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले. हा संदेश अदार पूनावाला यांच्याकडून आला आहे असे समजून संचालकांनी पैसे हस्तांतरित केले. अशाप्रकारे सायबर गुन्हेगारांनी ही फसवणूक केली.

पोलिसांनी सांगितले की, संचालक सतीश देशपांडे यांना सीईओ आदर पूनावाला यांच्या नंबरवरून काही बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याच्या सूचनांसह एक व्हॉट्सअॅप मेसेज आला होता. यानंतर कंपनीच्या बँक खात्यांमधून 1,01,01,554 त्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीचे फायनान्स मॅनेजर सागर कित्तूर यांच्या तक्रारीवरून, भादंवि कलम 419, 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: ब्रिटनच्या गृहमंत्री Suella Braverman यांच्या वडिलांच्या गोव्यातील मालमत्तांवर बेकायदेशीर कब्जा, SIT सुरु केला तपास)

एफआयआरनुसार, फसवणुकीची ही घटना 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1.35 ते 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 च्या दरम्यान घडली. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही एक भारतीय जैवतंत्रज्ञान आणि बायोफार्मास्युटिकल्स कंपनी आहे आणि लसींची जगातील सर्वात मोठी उत्पादक आहे. ही कंपनी कोविशील्ड लस तयार करते, जी भारतात वापरात असलेल्या प्रमुख कोविड-19 लसींपैकी एक आहे.