COVID-19 Vaccine Update: कोविशिल्ड लसीचा एक डोस सरकारला 250 रुपयांना देणार- अदर पूनावाला
Adar Poonawalla-Covishield (Photo Credits: Twitter)

केंद्र सरकार कोविशिल्ड लसीचे (Covishield Vaccine) 90% डोस खरेदी करणार असल्याची माहिती सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Serum Institute of India, CEO Adar Poonawalla) यांनी दिली आहे. NDTV शी बोलताना पूनावाला यांनी सांगितले की, "कोविशिल्ड लस सरकारला 250 रुपये प्रती डोस तर फॉर्मासिस्टना 1000 रुपये प्रती डोस अशी उपलब्ध होईल." (COVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट)

जुलै पर्यंत 30 ते 40 कोटी डोसेस खरेदी करण्याची सरकारची योजना आहे. खाजगी विक्रेत्यांसाठी ही लस 500 ते 600 रुपयांना उपलब्ध होणार असून वितरकांसाठी 200 रुपये अधिक आकारण्यात येतील. तर सरकारसाठी 250 रुपये किंवा त्याहून कमी किंमतीत ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे. कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका या फार्मा कंपनीने एकत्रितपणे विकसित केली आहे. या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी सीरम इंस्टीट्यूट आणि सरकारमध्ये करार झाला आहे.

कोविशिल्ड लसीचे कमीत कमी 10 कोटी डोस जानेवारी 2021 पर्यंत उपलब्ध होतील, असे पुनावाला यांनी सांगितले. भारतामध्ये लस उपलब्ध होण्यासाठी अजून 2-3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. तसंच सामान्य नागरिकांना मार्च 2021 पर्यंत लसीचे डोस उपलब्ध होतील. त्यापूर्वी खाजगी बाजारपेठांमध्ये ही लस उपलब्ध होणार नाही, असेही ते म्हणाले.

मार्चपर्यंत सामान्य नागरिकांना ही लस सहजरित्या मिळणार नाही. सरकारी वितरण केंद्रामधून केवळ पात्र व्यक्तींनी ही लस देण्यात येईल. कारण लसीच्या पहिल्या टप्प्यात गरजू व्यक्तींना अधिक प्राधान्य दिले जाईल, असे पूनावाला यांनी सांगितले. दरम्यान, ही लस कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी अधिक कार्यक्षम असल्याची घोषणा आज सकाळी अ‍ॅस्ट्रॅजेनेका ने केली.

देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे परत लॉकडाऊन, निर्बंध लावण्यात येतील का? अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे. त्यामुळे लसीचे विकास, उपलब्धता याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.