Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

COVID-19 Spike:  देशात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होतच नाही आहे. उलट दिवसागणिक झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याच दरम्यान, कोरोनाची महासंकट पाहता 13 विरोधी पक्षांनी रविवारी केंद्र सरकारला मोफत लसीकरण मोहिम चालवण्याचा आग्रह केला आहे. या पक्षांतील नेत्यांनी एका विधानात असे ही म्हटले की, केंद्राने सर्व रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा करावा. कारण रुग्णांची वाढ झाल्याने संपूर्ण व्यवस्थेवर ताण पडला आहे. गेल्या 10 दिवसांपासून सातत्याने प्रत्येक दिवशी 3 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी तर हा आकडा 4 लाखांच्या पार गेल्याचे दिसून आले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, एचडी देवगौडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, डीएमके नेते एमके स्टालिन, बीएसपी प्रमुख मायावती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, एनसीपीचे प्रमुख शरद पवार, सीपीआय महासचिव डी राजा आणि सीपीएम महासचिव सीताराम येचुरी यांनी केंद्राला मोफत लसीकरण अभियानासंदर्भात अपील केले आहे.(MBBS आणि नर्सिंगमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कोविड ड्युटीसाठी तैनात करण्यात येणार? उद्या होणार निर्णय)

कोरोनासंकटाच्या दरम्यान, देशभरात लसीकरण मोहिम सुरु आहे. 1 मे पासून आता देशात 18 वर्षावरील नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या लसीचा डोस दिला जात आहे. मात्र काही राज्यात लसीचा तुटवडा भासत असल्याने सध्या लसीकरण मोहिम सुरु करण्यात आलेली नाही.

तर महाराष्ट्रातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येथे कोरोनाग्रस्तांमध्ये घट झाली आहे. राज्यात काही दिवसांपासून 24 तासाच येणाऱ्या रुग्णसंख्येत 60 हजारांची घट नोंदवण्यात आली आहे. राज्यात रविवारी 56,647 नवे रुग्ण तर मुंबईत 3672 नव्या रुग्णांचा नोंद झाली आहे.(Andhra Pradesh: सरकारी रुग्णालयात 14 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, ऑक्सिजनचा कमतरता असल्याची बाब नाकारण्यास प्रशासनाचा प्रयत्न)

परंतु राजधानी दिल्लीत रविवारी कोविडचे 20,349 रुग्ण आढळले असून 407 जणांचा बळी गेला आहे. दिल्लीतील आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सातत्याने दुसऱ्या दिवशी 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. राजधानीत संक्रमितांचा दर कमी होत 28.33 टक्क्यांवर पोहचला आहे. दिल्लीत सध्या 92,290 सक्रिय रुग्ण आहेत. दिल्लीत एकूण 11,94,946 रुग्ण समोर आले असून त्यामधील 10.85 लाख जणांची प्रकृती सुधारली आहे.