Coronavirus. (Photo Credit: PTI)

देशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) भयंकर अशा दुसर्‍या लाटेनंतर तिसर्‍या लाटेबाबत (Covid-19 3rd Wave) भीती व्यक्त केली जात होती. सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान कोरोनाची तिसरी लाट येईल अशी शक्यता व्यक्त केली गेली होती. आता हैदराबादच्या एका तज्ञाने म्हटले आहे की, कदाचित देशात कोरोनाची तिसरी आली असेल आणि जर लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर ही लाट भयानक ठरू शकते. हैदराबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विपिन श्रीवास्तव (Dr Vipin Srivatsava) यांनी गेल्या 15 महिन्यांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर असे म्हटले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉ. श्रीवास्तव म्हणाले आहेत की बहुधा कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने 4 जुलै रोजी देशात प्रवेश केला आहे. या अंदाजासाठी ज्या प्रमाणाचा वापर केला आहे, त्याला वैज्ञानिकदृष्ट्या 'डेली डेथ लोड' असे म्हणतात. श्रीवास्तव यांनी असा इशारा दिला आहे की, जर लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले नाही तर तिसरी लाट वेगाने वाढू शकते. तिसरी लाट नियंत्रित ठेवण्यासाठी, लोकांना सामाजिक अंतर, स्वच्छता, मास्कचा वापर आणि लसीकरण यासारख्या प्रोटोकॉलचे अनुसरण करावे लागेल. श्रीवास्तव यांनी वेव्ह पॅटर्न बनवण्यासाठी, गेल्या 461 दिवसांपासून टाइम्स ऑफ इंडियाने अपलोड केलेल्या डेटाचा वापर केला आहे.

यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालातही असे म्हटले गेले आहे की, लवकरच देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाने अहवालात म्हटले आहे की, भारतातील कोरोनाची तिसरी लाट पुढील महिन्यात येण्याची शक्यता आहे. यासह, सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लाट शिगेला पोहोचण्याचा दावा अहवालात केला गेला आहे. (हेही वाचा: कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये आढळतोय आता Cytomegalovirus व्हायरस, जाणून घ्या कसा कराल स्वत: चा बचाव)

एसबीआयच्या संशोधन अहवालात सांगण्यात आले आहे की, 7 मे रोजी भारतातील कोरोनाची दुसरी लाट शिगेला पोहोचली होती. सध्याच्या आकडेवारीनुसार, जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात भारत सुमारे 10,000 केसेसपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवड्यापर्यंत कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात.