Coronavirus: कोविड योध्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सूपूर्त केला धनादेश
Arvind Kejriwal | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात रुग्णांच्या मदतीला धावून येणाऱ्या कोविड योध्यांसाठी (COVID Warrior) दिल्ली सरकार (Delhi Government) धावून आले आहे. कोरोना रुग्णांची सेवा करताना एका कोविड योध्याचे निधन झाले. या योध्याच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकारने तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी या रकमेचा धनादेश कुटुंबीयांकडे बुधवारी (2 सप्टेंबर) हस्तांतरीत केला. राजेश कुमार भारद्वाज (Rajesh Kumar Bhardwaj) असे या 52 वर्षीय योध्याचे नाव आहे.

राजेश भारद्वाज हे दिल्ली येथील सेंट्रल जिल्ह्यातील नबी करीम येथील सीडीएमओ ऑफिसमध्ये फार्मासिस्ट होते. रुग्णांची सेवा करताना राजेश भारद्वाज यांचे कोरोना व्हायरस संसर्ग होऊन नुकतेच निधन झाले आहे. त्यांचा संपूर्ण परिवार फरीदाबाद येथे राहतो. कोरोना व्हायरस काळात कर्तव्य बजावत असताना 29 जून 2020 मध्ये त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले तरीही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. (हेही वाचा, Plasma Therapy: अमेरिकेने दिल्ली Delhi Model अनुसरले; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजेश कुमार भारद्वाज यांच्या कुटुंबीयांकडे 1 कोटी रुपयांचा धनादेश सोपवताना या पुढेही त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे अश्वासन दिले. तसेच, भारद्वाज यांची सेवा आणि योगदान याबद्दल सद्भावना व्यक्त केल्या.

पुढे बोलताना केजरीवाल यांनी सांगितले की, आम्हाला अशा योध्यांविषयी आदर आणि अभिमान आहे .ज्यांनी दिल्लीच्या जनतेसाठी स्वत:च्या प्राणाचे बलिदान दिले. आम्ही त्यांचे आयुष्य तर परत आणू शकत नाही. परंतू, त्यांच्या कुटुंबीयांना नक्कीच मदत करु शकतो. आशा आहे की, या पैशांमुळे भारद्वाज यांच्या कुटुंबीयांना नक्कीच काहीशी मदत होऊ शकते, अशा भावनाही केजरीवाल यांनी या वेळी व्यक्त केल्या.