कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्ण संख्येत मागील 24 तासात मोठी वाढ झाली असून, 2293 नवे रुग्ण आणि 71 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार, सद्य घडीला देशातील कोरोना बाधितांचा आकडा हा 37,336 वर पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या देशात कोरोनाचे 26,167 रुग्ण असून याशिवाय 1218 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील दिलासादायक वृत्त असे की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना 9950 जणांनी कोरोनावर मात केल्याचे सुद्धा समजत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. एकट्या महाराष्ट्रातच कोरोनाचे तब्बल 11 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत तर मृतांची संख्या ही 485 इतकी आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुजरात मध्ये 4721 कोरोना रुग्ण आढळले असून 236 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दिल्ली मध्ये सुद्धा 3738 कोरोना रुग्ण आणि 61 मृत्यूंची नोंद झाली आहे. दुसरीकडे मध्य प्रदेश (2719 रुग्ण, 145 मृत्यू) , राजस्थान (2666 रुग्ण, 66 मृत्यू) आणि तामिळनाडू ( 2526 रुग्ण , 28 मृत्यू) अशी आकडेवारी आहे. या पाच राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
ANI ट्विट
2293 new cases, 71 deaths in the last 24 hours; this is the highest number of cases reported in one day: Ministry of Health and Family Welfare https://t.co/kd8KWQJgY2
— ANI (@ANI) May 2, 2020
दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा लॉक डाऊनचा अवधी वाढवून 17 मे पर्यंत केला आहे. लॉक डाउनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनमुक्त असणाऱ्या राज्यातील जिल्ह्यात नियम शिथिल केले जाणार आहेत. यासाठी देशातील विविध जिल्ह्यांची रेड, ग्रीन, ऑरेंज झोन मध्ये विभागणी केली जाणार आहे, त्यानुसार ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील लॉक डाऊनचे नियम शिथिल केले जातील असे सांगण्यात आले आहे.