जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा विळखा भारत देशातही अधिक घट्ट व्हायला लागला आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी विविध क्षेत्रातील तब्बल 30000 डॉक्टर्स सज्ज झाले आहेत. यात सरकारी सेवेतून रिटायर्ड झालेले डॉक्टर्स, सैन्यात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स आणि प्रायव्हेट फिजिशयन्स यांचा समावेश आहे. या सर्व डॉक्टरांची फौज एकत्रितपणे कोरोना विरुद्धच्या लढ्यात सरकारला मदत करणार असल्याची माहिती जेष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. सरकारने 25 मार्च रोजी या सर्व डॉक्टरांना जीवघेण्या कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. सरकारने केलेल्या या आवाहनाचा आदर करत सेवानिवृत्त डॉक्टर्स, सैन्य दलातील डॉक्टर्स आणि खाजगी डॉक्टर्स यांच्या सह एकूण 30,100 डॉक्टरांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला आहे.
निती आयोग वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांनी तसंच देशसेवा करण्यासाठी तत्पर असलेल्यांनी पुढे येत वेबसाईटवर असलेल्या लिंकद्वारे स्वतःला रजिस्टर करावे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात पुढे आलेल्या स्वयंसेवी डॉक्टरांनी येत्या काळात सार्वजनिक आरोग्य सुविधा किंवा सरकारी हॉस्पिटल्स मध्ये संपर्क साधावा. तसंच देशातील विविध क्षेत्रातील डॉक्टरांना या गरजेच्या काळात पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 2902 इतकी झाली असून त्यात 68 लोकांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोना प्रादुर्भाव अधिक वाढला असून रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवांवर खूप ताण येत आहे. त्यांच्यावर भार हलका करण्यासाठी स्वयंसेवी डॉक्टरांनी पुढे येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अमेरिका, इटली, युके येथे कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तेथेही स्वयंसेवी डॉक्टरांनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.