'जनता कर्फ्यू'च्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून देशवासियांना दिला खास संदेश
PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरस मुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करत आहे. या विषाणूंनी भारतातही प्रवेश करत आपले डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशापुढे आहे. मात्र सरकार सुरुवातीपासूनच सतर्क असल्यामुळे वेळीच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दोन दिवसांपूर्वीच जनतेशी संवाद साधत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. त्यानुसार उद्या रविवार, 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या काळात देशभरात 'जनता कर्फ्यू' लागू होईल. त्यानंतर कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडता येणार नाही.

कोरोना व्हायरसने जगभरात घातलेला धुमाकूळ आणि देशातील रुग्णांची वाढती संख्या यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच जनता कर्फ्यू लागू केल्याने सामान्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जनता कर्फ्यूच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून जनतेसाठी खास संदेश दिला आहे.

"काळजी घ्या, पॅनिक होऊ नका. तुम्ही ज्या शहारात, गावात आहात तिथेच रहा. घरात सुरक्षित रहा. गरज नसल्यास विनाकारण प्रवास करु नका. हे तुमच्या इतके इतरांच्याही भल्याचे आहे. या परिस्थितीत एक लहानसा प्रयत्न देखील मोठा परिणाम करु शकतो," अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट:

Never forget - precautions not panic!

तर दुसऱ्या ट्विटमध्ये मोदींनी लिहिले की, "डॉक्टर आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची ही वेळ आहे. आतापर्यंत तुम्हाला सर्वांनी घरात राहा असे सांगितले असेल. या सूचनांचे पालन करा, असा माझा आग्रह आहे  यामुळे तुमच्यासोबतच तुमचे कुटुंब आणि मित्रपरीवार सुरक्षित राहील."

पंतप्रधान मोदींच्या जनता कर्फ्यू आवाहनाला देशभरातील व्यावसायिकांसह बॉलिवूड सेलिब्रेटींचा पाठिंबा मिळाला आहे. मात्र सामान्य जनता याला कसा प्रतिसाद देते, ते पाहणे महत्त्वाचे आहे.