Cloudburst in Himachal and Uttarakhand

मुसळधार पावसामुळे डोंगरावर निसर्गाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारी पुन्हा ढगफुटी झाली.हिमाचल प्रदेशातील चंबा आणि उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुलामध्ये ढगफुटी झाली. हिमाचल प्रदेशातील चंबा येथे ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे सलुनी उपविभागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना आपत्तीचा फटका बसला आहे. चंबाचे एडीसी अमित मेहरा म्हणाले, 'रस्ते आणि शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर मदत निधीबाबत निर्णय घेतला जाईल. (हेही वाचा - Mumbai Rain: मुंबईच्या समुद्रात भरती, मरीन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी)

उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात, धारचुलाच्या लिपुलेख सीमेवरील नच्छी नाल्यात ढगफुटीमुळे वाहने आणि पूल वाहून गेले. जिल्ह्यातील कालापानीजवळ ढगफुटी झाली आहे. त्यामुळे बीआरओचा पूल जमीनदोस्त झाला आहे. पूल तुटल्यामुळे लिपुलेख सीमेवरील वाहतूकही ठप्प झाली आहे.

पाहा व्हिडिओ -

जम्मू-काश्मीरमध्येही पावसाचा कहर

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात तीन मुलांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. कठुआचे उपायुक्त राकेश मिन्हास यांनी मृतांच्या नातेवाईकांना 50,000 रुपयांची तत्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर

संततधार पावसामुळे गंगा, यमुनेसह राज्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्र पौडी, टिहरी, हरिद्वार आणि डेहराडूनच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित भागात खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हरिद्वार, ऋषिकेश आणि इतर ठिकाणी पोलिसांकडून लोकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे आणि नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांकडून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची सुचना देण्यात आली आहे.