Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कावर्धा जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या दोन भावांची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एका भावाने आपल्या दोन भावांचा खून केला. एवढेच नाही तर या विक्षिप्त व्यक्तीने भावांच्या बचावासाठी आलेली पत्नी, मेव्हणा आणि मोठ्या भावावरही शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचीही प्रकृती गंभीर आहे. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या आरोपी भावाला अटक केली आहे.

हे संपूर्ण प्रकरण कावर्धा जिल्ह्यातील तारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बंगौरा गावाशी संबंधित आहे. एसपी डॉ लाल उमेद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ‘तिन्हा बेगा’च्या मुलाचे एक दिवस आधी लग्न झाले होते. विवाहसोहळा आटोपल्यानंतर सोमवारी बेगा कुटुंबातील लोक घरी पार्टी करत होते. लग्नाच्या आनंदात घरात नाच-गाणे, खाणे-पिणे चालू होते. आरोपीचा लहान भाऊ जगत बेगा आणि इतर कुटुंबीयांसह आरोपीची पत्नीही यामध्ये नाचत होती.

पत्नीला आपल्या भावासोबत नाचताना पाहून आरोपीला राग आला आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने प्रथम पत्नीवर चाकूने हल्ला केला. त्यातून तिने जीव वाचवण्यासाठी पळ काढला आणि तिला आपला जीव वाचवण्यात यश आले. त्यानंतर आरोपीने लहान भावावरही कुऱ्हाडीने वार केले. पुढे यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मोठ्या भावावरही वार केले, ज्यामध्ये त्याचाही मृत्यू झाला. आरोपीने इतर लोकांवरही हल्ला केला. (हेही वाचा: Crime: पुर्ववैमनस्यातून जुन्या भाडेकरूने केली घर मालकिणीची हत्या)

आरोपी दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अशाप्रकारे ज्या घरात एक दिवसापूर्वी लग्नाचे वातावरण होते, तेथे एका वेळी दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. सध्या जखमी भाऊ, मेव्हणा आरोपीची पत्नी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी तिन्हा बेगा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.