CBI कर्मचाऱ्यांना जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज घालण्यास बंदी; Subodh Kumar Jaiswal यांनी लागू केला नवा ड्रेस कोड
CBI (Photo Credits-Twitter)

केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये (CBI) ड्रेस कोड (Dress Code) लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीबीआयचे नवे संचालक सुबोधकुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांनी सीबीआयची प्रतिमा अधिक चांगली बनवण्याच्या दृष्टीने सीबीआयच्या सर्व कार्यालयांच्या सुपरव्हायजर्सना नव्या ड्रेसकोडची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आता सीबीआय अधिकारी किंवा कर्मचारी कर्तव्यावर असताना जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज घालू शकणार नाहीत. एजन्सीचे प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात योग्य औपचारिक कपडेच घालतील असा आदेश नवीन संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी दिला आहे.

सीबीआय संचालक जयस्वाल यांच्या मान्यतेने उपसंचालक (प्रशासन) अनूप टी मॅथ्यू यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, कार्यालयात जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट शूज किंवा चप्पल घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. पुरुष अधिकार्‍यांना असा आदेश देण्यात आला आहे की ते फक्त औपचारिक शर्ट-पँट आणि औपचारिक शूज घालतील, त्याच वेळी योग्य प्रकारे दाढी करूनच त्यांना कार्यालयात यावे लागेल. महिला अधिकारी किंवा कर्मचार्‍यांना कर्तव्यावर असताना केवळ साड्या, सूट आणि औपचारिक शर्ट घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सीबीआय अधिकाऱ्यांना किमान एक फॉरमल कॉलर्ड शर्ट, ट्राउझर आणि शूज घालणे आवश्यक आहे. या आदेशात, देशभरातील सीबीआयच्या सर्व शाखांच्या प्रमुखांना या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की ही एक संतुलित ऑर्डर आहे, कारण व्यावसायिक तपास एजन्सी म्हणून प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला फॉरमल पोशाख घालणे आवश्यक असते. मात्र, गेल्या काही वर्षांत लोकांनी जीन्स आणि टी-शर्टसारखे कॅज्युअल कपडे घालायला सुरुवात केली होती आणि त्यास कोणीही रोख लावली नाही. (हेही वाचा: महाराष्ट्राचे माजी DGP Subodh Kumar Jaiswal यांची सीबीआयचे नवे संचालक म्हणून नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत सुबोधकुमार जयस्वाल)

दरम्यान, 1985 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांनी बुधवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या 33 व्या संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांची दोन वर्षांसाठी सीबीआयचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे.