New CBI Director: महाराष्ट्राचे माजी DGP Subodh Kumar Jaiswal यांची सीबीआयचे नवे संचालक म्हणून नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत सुबोधकुमार जयस्वाल
Subodh Kumar Jaiswal (Photo Credits: Wikipedia)

देशातील प्रमुख तपास यंत्रणा सीबीआयला (CBI) त्याचे नवीन प्रमुख मिळाले आहेत. 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची सीबीआयचे नवे संचालक (CBI Director) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने सीबीआयचे नवीन संचालक म्हणून सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे. जयस्वाल यांची नियुक्ती 2 वर्षांसाठी असणार आहे. सुबोधकुमार जयस्वाल हे यापूर्वी महाराष्ट्रात पोलिस महासंचालक (DGP) होते. सध्या ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) महासंचालक आहेत.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या नवीन संचालकांच्या निवडीसाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. या समितीत पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आणि सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना होते. सीबीआय संचालकपदासाठी सुबोधकुमार जयस्वाल यांच्याव्यतिरिक्त सशस्त्र सीमा बल (SSB) महासंचालक कुमार राजेश चंद्रा आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांचीही नावे शर्यतीत होती. या बैठकीमध्ये जयस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

पॅनेलने 11 मे रोजी प्रथम 109 नावे पाठविली होती. यानंतर सोमवारी सभेच्या आदल्या दिवशी एक वाजता 10 नावे पाठविली गेली आणि संध्याकाळी चार वाजता त्यातील सहा नावे शॉर्टलिस्ट केली गेली. सध्या 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि सीबीआयचे अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा सीबीआय संचालकपदाची सूत्रे सांभाळत आहेत. ऋषीकुमार शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर सिन्हा यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. दोन वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर फेब्रुवारीमध्ये ते निवृत्त झाले.

कोण आहेत सुबोधकुमार जयस्वाल?

सुबोधकुमार जयस्वाल यांचा जन्म 22 सप्टेंबर 1962 रोजी झाला. सुबोधकुमार जयस्वाल वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी आयपीएस अधिकारी झाले. ते 1985 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी आहेत. इतक्या तरुण वयात आयपीएस पद भूषविलेले सुबोध कुमार आज 58 वर्षांचे आहेत. सुबोधकुमार जयस्वाल यांनी अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केले आहे. सुबोधकुमार जयस्वाल हे भारताची गुप्तचर संस्था रॉ (Research and Analysis Wing ) मध्ये बर्‍याच दिवसांपासून कार्यरत आहेत. ते रॉचे अतिरिक्त सचिवही राहिले आहेत. (हेही वाचा: तरुणाला थोबाडीत मारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निर्देशनावरुन पदावरुन हटवले)

1986 साली अमरावती येथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती. 2001 मध्ये जयस्वाल यांनी राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांना 2020 मध्ये असाधारण सुरक्षा सेवा प्रमाणपत्र (एएसएसपीपी), अंतर्गत सुरक्षा पदक (भारत सरकार) आणि विशेष सेवा पदक (महाराष्ट्र शासन) देण्यात आले आहे.