अॅमेझॉन कंपनीच्या भारतातील प्रमुखासह तीन इतर लोकांविरुद्ध ग्रेटर नोएडा येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा येथील एका व्यक्तिने दिलेल्या तक्रारीवरुन बिसरख पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार व्यक्तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत 'आपण अॅमेझॉन कंपनीकडून मोबाईल ऑर्डर केला होता. मात्र, अॅमेझॉनने या ऑर्डरच्या पूर्ततेसाठी पाठवलेल्या पार्सलमध्ये मोबाईलऐवजी चक्क साबण दिला. या प्रकारामुळे आपली घोर फसवणुक झाली' असा दावा आपल्या तक्रारीत केला आहे.
दुसऱ्या बाजूला अॅमेझॉनने ही घटना गांभीर्याने घेतली आहे. तसेच, घटनेच्या तपासात पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारीही दर्शवली आहे. दरम्यान, बिसरखचे सर्कल ऑफिसर निशंक शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'बिसरख पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ज्या तक्रारदाराच्या तक्रारीवरुन नोंदविण्यात आला आहे त्यात त्याने म्हटले आहे की, तक्रारदाराने अॅमेझॉन बेबसाईटच्या माध्यमातून एक मोबाईल फोन ऑर्डर केला होता. २७ ऑक्टोबरला त्याला डिलव्हरी मिळाली. त्याने पार्सल उघडून पाहिले तर, त्यात फोनऐवजी चक्क साबण होता.' (हेही वाचा, नोकिया या स्मार्टफोन्सवर देत आहे जबरदस्त कॅशबॅक ; सॅमसंगने कमी केल्या किंमती)
दरम्यान, पोलिसांनी आलेल्या तक्रारीच्या आधारे अॅमेझॉनचे भारतातील प्रमुख अमित अग्रवाल, लॉजिस्टिक्स फर्म दर्शिता प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रदीप कुमार आणि रविश अग्रवाल, डिलिव्हरी बॉय अनिल के याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणुक आणि विश्वासघात) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अॅमेझॉननेही असा प्रकार घडल्याची पुष्टी दिली असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.