Bryan Johnson (संग्रहित संपादित प्रतिमा)

टेक अब्जाधीश आणि प्रसिद्ध अँटी-एजिंग इन्फ्लुएंसर, संशोधक ब्रायन जॉन्सनने () अलीकडेच भारताला भेट दिली होती, परंतु येथील खराब हवेच्या गुणवत्तेमुळे तो इतका अस्वस्थ झाला की, त्याने झेरोधाचा सह-संस्थापक निखिल कामथचा पॉडकास्ट मध्येच सोडला व परत निघून गेला. N95 मास्क घालूनही आणि सोबत एअर प्युरिफायर घेऊनही, जॉन्सन धोकादायक हवेच्या परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही. जॉन्सन म्हणाला की, भारतातील वायू प्रदूषणामुळे त्याच्या त्वचेवर पुरळ उठत होते आणि डोळ्यांत आणि घशात जळजळ होत होती. ब्रायन जॉन्सनने भारत भेटीदरम्यान निखिल कामथचा पॉडकास्ट WTF चा एक भाग रेकॉर्ड केला. हे संभाषण मुंबईच्या वांद्रे परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत होत होते, जिथे एअर प्युरिफायर देखील बसवलेले होते.

असे असूनही, जेव्हा जॉन्सनला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तेव्हा तो शो मध्येच सोडून गेला. रेकॉर्डिंग दरम्यान भारतातील हवेच्या गुणवत्तेबद्दल भाष्य करताना तो म्हणाला की, ‘मी तुम्हाला स्पष्टपणे पाहू शकत नाही’. खोलीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुमारे 120 होता, जो सामान्यतः मध्यम श्रेणीत असतो, परंतु जॉन्सनच्या मते, बाहेरील हवा खोलीत फिरत होती, ज्यामुळे तिथले हवा शुद्ध करणारे यंत्र कुचकामी ठरले. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर संपूर्ण घटनेची पुष्टी केली. जॉन्सनच्या विधानामुळे मुंबईकरांमध्ये चिंता आणि चर्चा सुरू झाली, त्यापैकी अनेकांनी असे म्हटले की, सरकारने असे तंत्रज्ञान तयार करावे जे रिअल-टाइममध्ये हवा शुद्ध करेल.

Bryan Johnson on Poor Air Quality in India:

ब्रायन जॉन्सनने सांगितले की वायू प्रदूषण ही पर्यावरणीय समस्या नाही, तर ती सार्वजनिक आरोग्य संकट आहे. त्याने संपूर्ण जग प्रवास केला आणि विविध शहरी केंद्रांमध्ये वास्तव्य केले आहे. हवेतील कण आणि दूषित पदार्थांचे दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे फुफ्फुसांच्या कार्यापासून ते न्यूरोलॉजिकल आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होऊ शकतो, असे त्याने नमूद केले. वायू प्रदूषणाचे सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे प्रचंड पुरावे असूनही, भारतात हवेच्या गुणवत्तेच्या समस्यांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून का मानले जात नाही असा प्रश्न जॉन्सनने उपस्थित केला. त्याने सांगितले की, सर्व कर्करोग बरे करण्यापेक्षा वायू प्रदूषणाचे निराकरण केल्यास भारतीय लोकसंख्येचे आरोग्य अधिक प्रभावीपणे सुधारेल. (हेही वाचा: Anti-Aging Blood Transfusion: तरुण राहण्यासाठी सीईओ Bryan Johnson ने घेतले मुलाचे रक्त; वर्षाला स्वतःवर खर्च करत आहे 16 कोटी रुपये, जाणून घ्या कशी आहे लाइफस्टाइल)

ब्रायन जॉन्सनने खराब हवेच्या गुणवत्तेशी संबंधित गंभीर आरोग्य धोके आणि जागतिक स्तरावर प्रदूषणाशी संबंधित आरोग्य समस्या सोडवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची गरज यावर प्रकाश टाकला. दरम्यान, ब्रायनने भारतातील हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हटले की, ‘अमेरिकेत लठ्ठपणा जशी समस्या आहे तशीच प्रदूषण ही भारतात एक अदृश्य समस्या आहे’. तो म्हणाला की जेव्हा तो अमेरिकेत परतला तेव्हा त्याला पहिल्यांदाच लठ्ठपणाचे गांभीर्य जाणवले. त्यांनी लिहिले, ‘जेव्हा मी अमेरिकेत परतलो तेव्हा मला आढळले की लठ्ठपणा सर्वत्र आहे. अमेरिकन लोकसंख्येपैकी 42.4% लोक लठ्ठ होते, परंतु मी ते दररोज पाहत असल्याने मला त्याचे गांभीर्य कळले नाही.’