#BoycottPaytm: मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात चीनने चौथ्यांदा खोडा घातल्यानंतर Paytm वर बहिष्कार टाकण्याचे सोशल मीडियातून युजर्संना आवाहन
Paytm (Photo Credits: IANS)

भारतातील जम्मू काश्मीर येथील पुलवामा परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा मसूद अजहर (Masood Azhar) याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली. यासाठी भारताला जगातील अनेक देशांची साथ मिळाली. मात्र चीनने पुन्हा एकदा यात खोडा घातला आहे. असे करण्याची ही चीनची चौथी वेळ असल्याने संतप्त भारतीयांनी चीनविरुद्धची भूमिका मांडण्यासाठी पेटीएमवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सोशल मीडियावर एक अभियान सुरु करण्यात आले आहे.

सध्या ट्विटरवर #BoycottChina आणि #BoycottPaytm ट्रेंड होत आहे. चायनिज कंपनी 'अलीबाबा'ची पेटीएममध्ये मोठी भागीदारी आहे. पेटीएमची मुळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स लि. ही असून त्याचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आहे. अलीबाबाने पेटीएमचा 25% भाग विकत घेतला आहे. त्यामुळे चीनला झटका देण्यासाठी सोशल मीडियावरुन पेटीएम सोडण्याची मागणी केली जात आहे. अनेकांनी तर पेटीएम फोनमधून अनइस्टाल देखील केले आहे.

मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाला काल (बुधवार, 13 मार्च) चीनने नकार दिला. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या संयुक्त राष्ट्र परिषदेने 27 फेब्रुवारीला मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. चीनच्या या निर्णयानंतर भारतातून निराशा व्यक्त केली जात आहे. जैश-ए-मोहम्मदच्या 'मसूद अझहर'ला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव; अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनची भारताला साथ

14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर येथील पुलावामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत हल्ल्याचे चोख उत्तर दिले. या सर्व परिस्थितीत भारत-पाकिस्तान मधील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले आहे.