Bihar: वा रे पठ्ठ्या! गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित करत होता तरुण; पकडल्यावर पंचायतीने घेतला 'हा' निणर्य
Representational Image (Photo credits: PTI)

प्रेमात (Love) व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते, याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे अनेक चमत्कारीत किस्से आपण ऐकले असतील. कुणी प्रेमात गालिब बनले, तर कुणी मजनू. कुणी ताजमहाल बांधला तर कुणी मांझी म्हणून डोंगर खोदला. आता बिहारमधील (Bihar) एका प्रियकरानेही असाच काहीसा प्रकार केला, ज्यासाठी चक्क पंचायत बोलावावी लागली. तर बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील गणेशपूर गावातील एक इलेक्ट्रिशियन आपल्या गर्लफ्रेंडला चोरून भेटण्यासाठी संपूर्ण गावाची वीज (Power Supply) बंद करत होता.

अनेकवेळा हा प्रकार घडल्यानंतर आता ग्रामस्थांनी विजेच्या खांबावर चढून गावाची वीज तार वारंवार कापणाऱ्या या इलेक्ट्रिशियनला पकडले आहे. काही ग्रामस्थांनी त्याला हे करताना पाहिले होते. गावातील वीज खंडित करून तो खांबावरून खाली येताच ग्रामस्थांनी त्याला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर गावकऱ्यांनी मारहाण करून या तरुणाचे मुंडनही केले आणि शिक्षा म्हणून त्याची गावातून धिंड काढली.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर घडल्या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पंचायत बोलावण्यात आली. तेथे इलेक्ट्रिशियनने आपली चूक मान्य केली आणि सांगितले की, 'त्याचे गावातील एका मुलीवर प्रेम आहे आणि तिला भेटण्याची वारंवार संधी मिळत नसल्याने आपण हे कृत्य केले. अंधाराचा फायदा घेऊन आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तो वारंवार वीज खंडित करत होता. (हेही वाचा: लोड शेडींगचा फटका! लग्नात वीज गेल्याने वधूंची झाली अदलाबदल, भलत्याच पुरुषांशी लावले लग्न)

तरुणाची संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर पंचायतीने त्या तरुणीलाही बोलावून घेतले, जिच्यावर या तरुणाचे प्रेम होते. दोघांचे म्हणणे पंचायतीने ऐकून घेतल्यानंतर प्रियकर-प्रेयसीचे लग्न लावून देण्यात आले. स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी विकास कुमार आझाद यांनी सांगितले की, त्यांना या घटनेची माहिती होती मात्र अद्याप कोणीही याप्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही. गावकऱ्यांनी सांगितले की, वारंवार गावातील वीज खंडित होत असल्याने ते त्रस्त होते. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळी तीन-चार तास दिवे गायब असायचे परंतु आता इलेक्ट्रिशियनचे लग्न असल्याने ही समस्या बंद झाली आहे.