असे म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती शेवटचा श्वास घेते तेव्हा ती सर्व काही सोडून या जगाचा निरोप घेते. मात्र बिहारमधील (Bihar) पाटणा (Patna) जिल्ह्यात याच्या अगदी उलटे प्रकरण समोर आले आहे. पाटणा जिल्ह्यातील शाहजहांपूर पोलिस स्टेशन परिसरातील सिगरियावा गावात, एक मृत्यू झालेली व्यक्ती खात्यातील पैसे काढण्यासाठी कॅनरा बँकेच्या शाखेत पोहोचली. विशेष म्हणजे बँक मॅनेजरला या व्यक्तीला पैसे द्यावे लागले. यावर विश्वास बसणे थोडे कठीण असेल मात्र हे अंधश्रद्धेशी निगडीत प्रकरण नाही. तर मृतासोबत ग्रामस्थ बँक शाखेत पोहोचल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहजहांपूर पोलीस स्टेशन परिसरातील सिगरियावा गावातील महेश यादव (वय 55 वर्षे) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. ते काही काळ आजारी होते. त्यांच्या निधनानंतर, त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी त्यांच्या कॅनरा बँकेच्या स्थानिक शाखेतील खात्यातील रक्कम काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी बँकेत जाऊन पैशांची मागणी केली, परंतु कायदेशीर तरतुदींचा हवाला देत बँक व्यवस्थापनाने त्वरित पैसे देण्यास नकार दिला. यामुळे लोक संतापले व त्यांनी चक्क महेश यादव यांचा मृतदेह बँकेत नेला आणि पैशांची मागणी करण्यास सुरवात केली
घडल्या प्रकरणामुळे बँकेत सुमारे तीन तास गोंधळाचे वातावरण होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले व त्यांनीही ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काहीच ऐकून घेतले नाही. अखेर शाखा व्यवस्थापक संजीव कुमार यांनी त्यांच्या वतीने अंत्यसंस्कारासाठी 10 हजार रुपये दिले. यानंतर ग्रामस्थ मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले. (हेही वाचा: केवळ 70,000 रुपयांसाठी जन्मदात्या पित्यानेच विकले आपल्या 1 महिन्याच्या बाळाला, हैदराबाद मधील धक्कादायक घटना)
दरम्यान, महेश यांचे लग्न झाले नव्हते आणि त्यांच्या मागे त्यांचे स्वतःचे कोणीच नव्हते. त्यांच्या बँक खात्यात एक लाख अठरा हजार रुपये होते. पण बँक खात्यासाठी कोणीही नॉमिनी नव्हते, इतकेच नाही तर त्यांची केवायसीदेखील नव्हती. या कारणास्तव बँकेने पैसे देण्यास नकार दिला.