Bhopal: हमीदिया रुग्णालयामध्ये 2 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू; CM Shivraj Singh Chouhan नी दिले चौकशीचे आदेश
Coronavirus (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळात सरकार जागरुकतेसाठी विविध उपयोजना राबवत आहे. रुग्णालयांमध्ये शक्य तितक्या चांगल्या रीतीने कोरोना रुग्णांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र कधी कधी थोडासा निष्काळजीपणा रुग्णांच्या जीवावरही बेतू शकतो, अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) घडली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील (Bhopal) सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात 2 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी, पॉवर बॅकअप देखील कार्य करू शकले नाही. विजेच्या अभावामुळे आयसीयूमध्ये भरती असलेल्या रूग्णांची तब्येत बिघडली व यामध्ये आतापर्यंत 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हमीदिया रुग्णालयामध्ये (Hamidia Hospital) दुर्लक्ष झाल्याने घडलेल्या या घटनेमुळे राजकारण तापले आहे. सीएम शिवराजसिंह चौहान यांनीही कडक पावले उचलत दोषींवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हमीदिया रुग्णालयाच्या डीनला नोटीस पाठविण्यात आली असून देखभाल अभियंताला निलंबित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असणाऱ्या हमीदिया हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सायंकाळी कोरोना युनिटची वीज जवळजवळ अडीच तास गुल होती. यानंतर, दहा मिनिटांच्या बॅकअपनंतर जनरेटर देखील बंद पडला. यामुळे रुग्णांमध्ये गोंधळ माजला होता. त्यानंतर हायफ्लोच्या सपोर्टवर असलेल्या 2 रुग्णांची मशीन्स बंद पडली. दरम्यान, माजी नगरसेवक 67-वर्षीय अकबर खान यांचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे हमीदियात निष्काळजीपणामुळे आतापर्यंत 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी 5.48 वाजता वीज गेली आणि 7.45 वाजता परत आली. यावेळी कोरोनो वॉर्डमध्ये 64 रुग्ण उपस्थित होते, त्यापैकी 11 जण गंभीर असून त्यांना आयसीयू वॉर्डात ठेवले गेले होते. (हेही वाचा: Covid-19 Vaccine Update: Pfizer-BioNTech च्या लसीला अमेरिकेच्या FDA कडून आपात्कालीन वापरासाठी मंजूरी)

वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग म्हणाले की, ‘हमीदियात निष्काळजीपणामुळे आतापर्यंत 3 मृत्यू झाले हे दुर्दैवी आहे. बॅकअपसाठी सरकारने जनरेटरचीही व्यवस्था केली. सर्व व्यवस्था योग्य रीतीने कार्य कराव्यात यासाठी खास वेगळे बजेट ठेवण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये कोणीही दोषी आढळू, ती कितीही मोठी व्यक्ती असली तरी त्याला सोडले जाणार नाही. सायंकाळी हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल. यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल.’