Pfizer (Photo Credits: IANS)

अमेरिकेच्या FDA कडून फायझर (Pfizer Inc) आणि बायोएनटेक (BioNTech)  च्या कोवि़ड-19 लसीला (Covid-19 Vaccine) आपात्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती रॉयटर्सने (Reuters) दिली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अमेरिकेत सर्वाधिक आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अमेरिका अग्रस्थानी होती. तसंच अमेरिकेत कोविड-19 संसर्गामुळे आतापर्यंत 292,000 लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेतील नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे.

जर्मनीच्या बायोएनटेक सोबत विकसित केलेली ही लस कोविड-19 वर 95% प्रभावी असल्याचे अंतिम चाचण्यांमधून दिसून आले आहे. ही लस 16 आणि पुढील वयोगटातील व्यक्तींना देण्यात येईल, असे FDA ने सांगितले. तसंच लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 29 लाख डोसेस देण्यात येणार असून आरोग्यसेवक आणि वृद्धांना प्राधान्य देण्यात येणार आहे. (Pfizer's COVID-19 Vaccine घेतलेल्या युके मधील दोन जणांना अॅलर्जिक रिअॅक्शन; MHRA ने दिल्या 'या' सूचना)

ANI Tweet:

FDA कडून लसीला मान्यता मिळाल्यानंतर लगेचच लसीकरणाला सुरुवात होईल, असे अमेरिकन प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार आता पुढील आठवड्याच्या सुरुवातीपासून लसीकरण सुरु होईल. दरम्यान, मॉडर्नाच्या लसीला लवकरच मान्यता मिळाल्यास अमेरिकेतील लाखो नागरिकांना या महिन्यात लस मिळण्याची शक्यता आहे. (Pfizer COVID-19 Vaccine ला भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची कंपनीकडून मागणी)

Pfizer-BioNTech च्या लसीला ब्रिटन, बहरीन देशांमध्ये मान्यता मिळाली असून युके मध्ये लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. तर कॅनडाने देखील लसीला मंजूरी दिली असून पुढील आठवड्यात लसीकरणाला सुरुवात होईल. दरम्यान, भारतातही फायझरने आपात्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे. लवकरच या लसीला मंजूरी मिळेल अशी आशा आहे.